विरार, 04 फेब्रुवारी : जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील नणंद, भावजाय यांच्यामध्ये भर रस्त्यावर तुफान हाणामारी झाल्याची घटना विरारमध्ये (Virar) घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विरार पश्चिमेच्या भाजी मार्केट परिसरात 2 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. जमिनीच्या वादातून नणंद भावजयमधील तुंबळ हाणामारी झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
घरापासून काही अंतरावरून जात असता एका बोळीत भावजय आशा पाटील आणि नणंद प्रभा ठाकुर अचानक आमनेसामने आल्या होत्या. त्यावेळी दोघींमध्ये बाचाबाची झाली. काही वेळानंतर बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. यावेळी प्रकाश ठाकूर, प्रभा ठाकूर यांना चार जणांनी मारहाण केलेली आहे. आशा पाटील आणि प्रभा ठाकूर यांच्यामध्ये जमिनीवरून वाद सरू होता. या वादाचे रूपांतर 2 फेब्रुवारी रोजी हाणामारीत झाले. या प्रकरणी प्रभा ठाकूर यांच्याविरोधात विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर भावजय आशा पाटील यांना इतर 5 जणांनी मारहाण केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विरार पोलीस करीत आहेत.