सातारा, 29 सप्टेंबर : अभिनेते सजायी शिंदे आणि त्यांचे वृक्षप्रेम हे काही त्यांच्या चाहत्यांसाठी नवीन नाही. वृक्ष लावले जावे व त्यांचे जतन केले जावे यासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक उपक्रम केले आहेत. त्यातच शिंदेंनी नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे.
सयाजी शिंदेंनी साताऱ्यात हा उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले आहे. सह्याद्री देवराईच्या माध्यमातून जय जवान जय किसान ही संकल्पना राबवली आहे. याअंतर्गत साताऱ्यातील प्रत्येक शहीद जवानाच्या नावाने झाड लावण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांऐवढा ताकदवान दुसरा कोणी नाही. त्यांची ताकद अजूनपर्यंत त्यांनाच कळालेली नाही. 5 कोटींच्या बंगल्यात राहणाऱ्यांपेक्षा शेतकरी अधिक सुखी आहेत. कोटींचा बंगला घेण्यापेक्षा झाड होऊन माळरानावर सावली घ्या.
हे ही वाचा-Viral Video : आजीचे प्राण वाचविण्यासाठी लहानग्याने केला उधळलेल्या वळूशी मुकाबला
प्रत्येक शहीद जवानाच्या आठवणीत एक झाड लावण्यात येणार असून त्या झाडाची काळजी घेण्याचं आवाहन सयाजी शिंदेंनी केलं आहे. गावात खूप राजकारणी, पक्ष, दोन वेगवेगळे पक्ष असताना यातून बाहेर पडत तुम्ही गावकऱ्यांनी सैनिकांच्या नावाने झाडे लावण्याचा ठराव केला ते अत्यंत चांगली बाब आहे. आज वडगाव दडसवाडा येथे शहीद सैनिकांचे कुटुंब व गावकऱ्यांनी माळरानावर वृक्ष लागवडीची सुरुवात केली. यामध्ये चिंच, जांभूळ, आवळा यांसारख्या 1 हजार 500 झाडे लावण्याचा संकल्प गावकरी व सयाजी शिंदेनी केला. लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
सयाजी शिंदेंची सह्याद्री देवराई
बीड शहराजवळ पालवण येथील वनविभागाच्या दोनशे हेक्टर परिसरात मागील काही महिन्यांपासून ‘सह्याद्री देवराई’ हा वृक्ष लागवडीचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्ष मित्र आणि नागरिकांच्या पुढाकारातून या ठिकाणी काम सुरू केले आहे. विविध जातीच्या पावणे दोन लाख वृक्षांची या ठिकाणी लागवड करण्यात आली असून काही दिवसात हा ऑक्सिजन झोन तयार होईल, असा मत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलं. सयाजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी शासन आणि लोकसहभागातून प्रयत्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.