शेगाव, 23 मे : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे अनेक भागात पाण्याची टंचाई दिसून येतेय. दरम्यान, शेगाव तालुक्यातल्या एका शेतकऱ्याने वीज पुरवठ्याअभावी शेतीला पाणी देता येत नसल्याने निराश होत तीन एकरातला गहू पेटवून दिला. आधीच आस्मानी संकटाने पिचलेल्या बळीराजावर वीज वितरण विभागाच्या मनमानी कारभारामुळे उभं पीक पेटवून देण्याची वेळ आली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शेगाव तालुक्यातील चिंचोली येथील रमेश सानप या शेतकऱ्याने तीन एकर गहू अक्षरशः जाळून टाकला. गहू पेरल्यानंतर गहू चांगला आलेला. पण वारंवार तक्रारी देऊनसुद्धा विद्युत विभागाकडून विद्युत पुरवठा सुरळीत होत नव्हता. त्यामुळे गव्हाला पाणी देता न आल्यामुळे हा संपूर्ण गहू पूर्णपणे वाढू शकला नाही. यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात धरण उशाला कोरड घशाला अशी अवस्था! पाणी टंचाईमुळे बेहाल शेतकरी रमेश सानप यांनी वेळोवेळी वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मागणी करूनही विद्युत सुरळीत झाला नाही. हाताशी आलेलं पीक त्यामुळे जाण्याची चिन्हे निर्माण झाली. तहसीलदारांपासून ते राष्ट्रपतींपर्यंत यासाठी तक्रार केली. मात्र तरीही काहीच हाती न लागल्याने शेवटी हतबल शेतकऱ्याने गहू पेटवून देण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.