धुळे, 21 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) नियंत्रणात आला आहे. कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सरकार सध्या नागरिकांचं लसीकरण (Corona vaccination in india) करण्यावर जास्तीत जास्त भर देत आहे. लसीकरणाचे दररोज नवनवीन आकडे देखील समोर येत आहेत. अलीकडेच देशात 100 कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. असं असंताना आता आरोग्य विभागाचा लसीकरणाबाबतचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याच्या मालपूर येथे सहा महिन्यापूर्वी निधन झालेल्या व्यक्तीला कोरोना लशीचा दुसरा डोस घेतल्याचा मेसेज प्राप्त झाला आहे. 19 ऑक्टोबर 2021 रोजी हा मेसेज आला आहे. मृत व्यक्तीच्या लसीकरणाबाबत आलेला मेसेज पाहून कुटुंबीय देखील हैराण झाले आहेत. लसीकरणाची संख्या वाढवण्यासाठी सरकारकडून असा प्रकार केला जात असल्याच्या चर्चा गावात सुरू आहे. हेही वाचा- Coronavirus : 8 महिन्यांनंतर पुण्यातून समोर आली मोठी दिलासादायक बातमी लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील रहिवासी असणाऱ्या बन्सिलाल सुका धनराळे (वय-66) याचं सहा महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झालं आहे. त्यांनी मृत्यूपूर्वी 10 मार्च 2021 रोजी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर त्यांचं निधन झालं होतं. मृत्यूला सहा महिने उलटल्यानंतर, 19 ऑक्टोबर 2021 रोजी बन्सिलाल यांनी कोरोना लशीचा दुसरा डोस घेतल्याचा मेसेज त्यांच्या मोबाइलवर आला आहे. हेही वाचा- ‘आज होगा जश्न’, भारत देश कोरोना लसीकरणात बनवणार नवा रेकॉर्ड बन्सिलाल यांच्या मुलाने संबंधित मेसेजमध्ये असणाऱ्या लिंकच्या आधारे प्रमाणपत्र डाऊनलोड केलं असता, त्यामध्ये सहा महिन्यापूर्वी मृत पावलेल्या बन्सिलाल यांनी लशीचे दोन्ही डोस घेतल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दुसरा डोस त्यांनी मालपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतल्याचं संबंधित प्रमाणपत्रात नमूद करण्यात आलं आहे. अनावधनाने बन्सिलाल यांचा मोबाइल नंबर टाकला आणि दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने संबंधित नंबर व्हेरिफाय केल्याने ही चूक झाल्याची माहिती मालपूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र पाटील यांनी दिव्य मराठीला दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.