नाशिक, 01 जुलै : नाशिक (nashik) येथे असणारे त्र्यंबकेश्वर मंदिर (Nashik Trimbakeshwer Temple) जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात हे मंदिर प्रसिद्ध आहे. यामुळे येथे दररोज हजारो भाविकांची रेलचेल असते. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर, संत निवृत्तीनाथ मंदिर, कुशावर्त तीर्थ, ब्रह्मगिरी आदी पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते. यातील अनेक भाविक या ठिकाणी पूजाविधी करण्यासाठी येत असतात. दरम्यान हे मंदिर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते पुन्हा हे मंदिर चर्चेत आले आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडवर बर्फ जमा (Nashik Trimbakeshwer Temple ice) झाल्याचा पुजाऱ्यांनी दावा केला आहे. याबाबत खरे कि खोटे याची शहानिशा प्रशासन करत असल्याचे सांगण्यात आले.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात मुख्य पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडीओ समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पुजाऱ्यांनी दावा केला आहे याची सत्यता पडताळण्यासाठी तेथील प्रशासन मंदिरात पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान सीसीटीव्ही तपासून त्या पिडींवर खरचं बर्फाचा गोळा तयार झाला आहे की यापाठीमागे दुसरं काही आहे का हे शासकीय अधिकारी तपासत असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा : संजय राऊतांची आजपासून खरी कसोटी ईडीला सामोरे जाणार, किरीट सोमय्यांनी डिवचले
पुजाऱ्यांकडून पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओही समोर आल्याचे ते सांगत आहेत. दरम्यान यापूर्वी भारत चीन युद्धावेळी असा गोळा आल्याचे बोलले जात आहे. १९६२ साली असाच बर्फ जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ईशान्य भारतात संकट आल्या नंतर हा चमत्कार झाल्याची माहिती देण्यात येत आहे. ईशान्य भारतातील आसाम पाण्याखाली गेल्या नंतर त्र्यंबकेश्वर मंदिरात पुन्हा पिंडीवर चमत्कारिक बर्फ आल्याचे तेथील पुजाऱ्यांकडून बोलले जात होते.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील सीसीटीव्हीची तपासणी करून अधिकृत माहिती मंदिर प्रशासन देणार आहे. यामुळे जोपर्यंत सीसीटीव्ही फुटेज समोर येत नाही तोपर्यंत याची माहिती मिळणे कठीण आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची देशभरात ओळखले जाते. या घटनेमुळे पुन्हा हे मंदिर चर्चेत आले आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी : राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट, फडणवीस आणि धनंजय मुंडेंमध्ये झाली मध्यरात्री खलबतं
मंदिर वारंवार अनेक कारणांमुळे चर्चेत
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी लेखापरीक्षकाला मारहाण केल्याची तक्रार त्र्यंबकेश्वर पोलिसांत दिली आहे. तर दुसरीकडे लेखापरीक्षकाच्या विरोधात उर्वरित विश्वस्तांनी पत्रकार परिषद घेत लेखापरीक्षकावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून वाद चिघळला होता. दरम्यान यापूर्वी अनेक घटना घडल्याचे दिसून आले आहे.