मुंबई, 4 जून : राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन (Maharashtra Government appeal people to wear face mask) करण्यात आलं आहे. राज्यातील सार्वजनिक ठिकाणी, तसेच बंदिस्त ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या संदर्भात राज्याच्या आरोग्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी म्हटलं, राज्यात काही जिल्ह्यांत रुग्णवाढ होत आहे. त्यात मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी रुग्णवाढ होत आहे त्या ठिकाणी आपण मास्क वापरण्याचं आवाहन करावं. मास्क सक्ती करण्यात आलेली नाहीये. त्यादृष्टीने 10 -15 दिवस रुग्णवाढ होत असलेल्या ठिकाणी आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापरायला हवा. ज्यामध्ये बसेस, लोकल ट्रेन, ऑफिस, शाळा, सिनेमागृह, सभागृह, मॉल्स अशा ठिकाणी मास्क वापरावे. इतर ठिकाणी मास्क वापरण्यावर शिथिलता असावी.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे. लसीकरण वाढवण्यावर भर देण्याचं तसंच बुस्टर डोस देण्यावरही भर देण्यात येत आहे. आरोग्य सचिवांच्या पत्रात मस्ट शब्द वापरला आहे. इंग्रजीत मस्ट वापरल्यामुळे तो सक्तीचा होत नाही. ते आवाहन आहे असं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुढे म्हटलं, 15 ते 20 दिवस अद्यापही आपल्याला परिस्थिती पहावी लागेल. त्यानंतर मास्क सक्ती करायची की नाही यावर परिस्थिती आणि रुग्णसंख्या पाहून निर्णय घेण्यात येईल. सध्या मास्क सक्ती नाहीये केवळ आवाहन करण्यात आलं आहे.
दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्ससोबत एक बैठक घेतली. या बैठकीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला मास्क परिधान करण्याचं आवाहन केलं होतं.
टास्कफोर्सच्या बैठकीत कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत तज्ज्ञांनी मुख्यमंत्र्यांना सध्याच्या परिस्थतीविषयी माहिती दिली. नवा कोरोना व्हेरिएंट हा कितका घातक आणि संसर्गजन्य आहे याविषयी माहिती देण्यात आली. कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने काय-काय उपाययोजना करता येतील याबाबत मंथन झालं. या बैठकीत राज्यात पुन्हा मास्कसक्ती करायची का? या विषयी देखील चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांचं मत ऐकून घेतल्यानंतर राज्यात सध्यातरी मास्कसक्तीची आवश्यकता नाही, असा निर्णय घेतला. पण मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला मास्क वापरण्याचं आवाहन केलं. तसेच गर्दीमध्ये शक्यतो मास्क वापराच, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Coronavirus, Face Mask, Maharashtra News, Rajesh tope