मुंबई, 05 एप्रिल: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी मोठी बातमी समोर आली आहे. सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) अर्थात ईडीने खासदार संजय राऊत यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने जप्त केलेली संपत्ती मुख्यत: अलिबाग आणि मुंबईतील आहे. ईडीने किती संपत्ती केली जप्त? ईडीने संजय राऊत यांची जी संपत्ती जप्त केली त्यामध्ये दादर याठिकाणी असणारा एक फ्लॅट तर अलिबागमध्ये असणाऱ्या 8 जागा आहेत. प्रविण राऊत यांच्या अटकेनंतर ईडीने ही कारवाई केली आहे. 1,034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती एजन्सीने दिली आहे. याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे.
Enforcement Directorate attached Shiv Sena leader Sanjay Raut's property in connection with Rs 1,034 crore Patra Chawl land scam case, the agency said.
— ANI (@ANI) April 5, 2022
(File pic) pic.twitter.com/ocaQgh2Jnt
ईडीच्या कारवाईनंतर समोर आली संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया या कारवाईनंतर संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘ईडीने जप्त केलेल्या फ्लॅटमध्ये माझं कुटुंब राहतं. ईडीच्या कारवाईला सामोरं जाण्यासाठी आम्ही खंबीर आहोत.’ शिवाय आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन, असं म्हणत संजय राऊत यांनी प्रतिआव्हानचं दिलं आहे. सध्या त्याचं ट्वीट देखील चांगलचं चर्चेत आलं आहे.
असत्यमेव जयते!!
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 5, 2022
काय आहे प्रकरण? गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचं काम देण्यात आलं होतं. मात्र प्रवीण राऊत यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या साथीनं या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थ नगर भागातील या झोपडपट्टीचं काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी इथला एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला. हा व्यवहार तब्बल 1000 कोटी रुपयांचा होता. एचडीआयएलच्या प्रमोटर्सना पैशांची अफरातफर करण्यात मदत केली, असा आरोपही प्रवीण राऊत यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी देखील सध्या ज्याप्रकारे ईडी महाराष्ट्रातील नेत्यांवर कारवाई करत आहेत त्यावरून संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधाला होता. तेव्हा त्यांनी भाजपच्या काही नेत्यांची नावं घेत त्यांना देखील जाब विचारला होता. किरीट सोमय्या यांची तिखट प्रतिक्रिया दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील या घटनेवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत असे म्हटले की, ‘आज ईडीने कारवाई करून संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन, प्रॉपर्टी आणि दादर येथील फ्लॅट जप्त केला आहे. संजय राऊत यांना आधीच लक्षात आले होते त्यांनी म्हणून 55 लाख ईडी कार्यालयात परत केले होते. गेल्या दोन महिन्यापासून ते ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, ही त्यांची मानसिक अवस्था मी समजु शकतो.’ सोमय्या पुढे म्हणाले की, ‘यांना वाटत की पोलिसांचा माफियासारखा वापर करून तोंड बंद करता येईल. पण कारवाई होणारच. हा 1 हजार 48 कोटींचा घोटाळा आहे, ही तर कारवाईची सुरुवात आहे. कारवाई होणार नाही, हा त्यांचा भ्रम आहे. मी काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटलो होतो.’ ‘मला असं वाटतं की संजय राऊत यांना असं काहीतरी होईल याची चाहूल लागली होती. त्यामुळे गेले काही दिवस त्यांची नौंटकी सुरू होती’, अशा शब्दात सोमय्या यांनी राऊतांना लक्ष्य केले आहे. दरम्यान संजय राऊत यांच्यावर टीका केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी त्यांच्या मोर्चा मुख्यमंत्र्यांकडे देखील वळवला. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांना यांना जाब विचारायला हवा. उद्धव ठाकरेंना असे वाटत की ते माफिया सेनेचे माफिया सरकार आहेत. या प्रकरणात गृहमंत्री यांनी माहिती घेतली पाहिजे.’ संजय राऊत यांनी जी ‘असत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया दिली आहे त्यावर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, ‘तुम्ही असत्यमेव जयते म्हणता मग 55 लाख जमा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी का विचारले नाही’. असा थेट सवालच त्यांनी शिवसेनेला केला आहे.