Home /News /maharashtra /

सुरेश जैन यांनी मंत्री झाल्यावर केला होता 'घरकुल घोटाळा' दडपण्याचा प्रयत्न

सुरेश जैन यांनी मंत्री झाल्यावर केला होता 'घरकुल घोटाळा' दडपण्याचा प्रयत्न

सुरेश जैन यांनी वेळोवेळी हा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी कायम पक्षबदल केला. सत्तेत असलेल्या पक्षात प्रवेश केला. मात्र, शेवटी या लढ्याला यश आले.

    राजेश भागवत, (प्रतिनिधी) जळगाव, 1 सप्टेंबर- जळगाव नगरपालिकेतील बहुचर्चित घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळे विशेष न्यायालयात शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री सुरेश जैन यांना 7 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आणि सुमारे 100 कोटी रुपयांचा दंड सुनावला आहे. या घोटाळ्यातील इतर दोषींनाही न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सुरेश जैन यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. 'सुरेशदादा इज चक्की पिसिंग अँड पिसिंग', अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश जैन यांचा घरकुल घोटाळ्यासंदर्भात 20 ते 25 वर्षांपासून आपण विधानसभा व विधानसभेबाहेर आवाज उठवला. माझ्यासह दिवंगत नरेंद्र पाटील आणि इतर अधिकाऱ्यांनी हा सामूहिक लढा दिल्याचे एकनाथ खडसेंनी सांगितले. सुरेश जैन यांनी वेळोवेळी हा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी कायम पक्षबदल केला. सत्तेत असलेल्या पक्षात प्रवेश केला. मात्र, शेवटी या लढ्याला यश आले. अखेर सत्याचा विजय झाला. सुरेश जैन आणि सहकारी हे एक दिवस जेलमध्ये जातील आणि चक्की पिसतील, असे वक्तव्य आपण त्याचवेळी केले होते. आज तो त्यांचा चक्की पिसण्याचा दिवस आला आहे. धुळे न्यायालयाने घरकुल घोटाळ्याप्रकरणी मोठा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरसेवकांना 183 कोटीचा जबर दंड ठोठावण्यात आलेला आहे. भष्टाचाऱ्यांना धाक वाटावा, असा हा निकाल असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ऐतिहासिक निर्णय, सुरेश जैन यांना 100 कोटींचा दंड! जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन, राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर, चोपड्याचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या सर्व 48 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले. नंतर विशेष जिल्हा न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी सुरेश जैन यांना 7 वर्षांचा कारावास आणि 100 कोटींचा दंड ठोठावला. गुलाबराव देवकर यांना 5 वर्षांची शिक्षा आणि 5 लाखाचा दंड ठोठावण्यात आला. तर माफीच्या साक्षीदार सिंधू विजय कोल्हे यांची याप्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या घोटाळ्यातील दोषी प्रदीप रायसोनी 7 वर्षांची शिक्षा आणि 10 लाख दंड, राजेंद्र मयूर आणि जगन्नाथ वाणी यांना 7 वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी 40 कोटींपर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे. सर्व संशयित 48 आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. निकालाचे कामकाज चालले तब्बल 20 तास... धुळे विशेष न्यायालयात घरकुल घोटाळ्याच्या निकालाचे कामकाज तब्बल 20 तास चालले. शनिवारी सायंकाळी पाच वाजता न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावली. मात्र, आरोपींच्या निकाल पत्र देण्यासाठी काम रविवारी पहाटेपर्यंत चालले. सकाळी 6 वाजता पोलिसांनी सर्व 48 दोषींना न्यायालयातून वैदकीय तपासणीसाठी नेले. न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडत असताना अनेक दोषींना रडू कोसळले. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात सर्व दोषींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांची धुळे जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. काय आहे जळगाव घरकुल घोटाळा? 'घरकुल योजना' ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले होते. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे 110 कोटींचे कर्ज काढून 11 हजार घरकुले बांधण्याच्या कामास 1999 मध्ये सुरुवात झाली होती. मात्र, या योजनेतील सावळागोंधळ सन 2001 मध्ये समोर आला. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहार यांचे लचांड उघडकीला आले. पालिकेने घरकुले ज्या जागांवर बांधली, ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. त्यासाठी बिगरशेती परवानगी घेतली गेली नव्हती. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील खानदेश बिल्डर्सला हे काम दिले. या ठेकेदाराला नियमबाह्य पद्धतीने सुमारे 29 कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ देण्यात आले. ठेकेदारास विविध सवलती देण्यात आल्या. निविदेतील काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराने पाळली नाही. उपरोक्त कामास पाच वर्षांहून अधिक विलंब करणाऱ्या ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही. VIDEO: 'आघाडीची हवा संपली हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही', मुख्यमंत्री फडणवीस यांची तुफान फटकेबाजी
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Eknath khadse, Suresh jain

    पुढील बातम्या