जळगाव, 22 नोव्हेंबर : जळगावचं राजकारण हे सध्या एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्याभोवती फिरत आहे. मागच्या काही दिवसांपासून दोन्ही नेते एकमेकांविरुद्ध टोकेचे आरोप करत आहेत, यामुळे अनेकदा वाद निर्माण होत आहेत. यावेळी चावट शब्दावरून वाद निर्माण झाला आणि एकनाथ खडसे यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली.
अशी ही बनवाबनवी चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चावट हा शब्द उच्चारून हास्याचे कारंजे फुलवले होते, पण हाच शब्द उच्चारून एकनाथ खडसे वादात अडकले. खान्देशच्या बोली भाषेत चावट हा शब्द वापरला जातो. एकनाथ खडसे यांनी हा शब्द गिरीश महाजन यांच्याविषयी वापरला, पण हा शब्द गिरीश महाजन यांना का लागला, असा प्रश्न एकनाथ खडसे यांना पडला आहे.
'खान्देशमध्ये असे शब्द वारंवार वापरले जातात. चावट म्हणणं तुम्हाला का लागावं? मला चावट म्हणलं तर मला लागत नाही. काय साल्या हा आमच्या बोलीभाषेतला शब्द आहे,' असं खडसे म्हणाले.
निखील खडसेंची आत्महत्या का खून? गिरीश महाजनांच्या आरोपांवर नाथाभाऊंचा पलटवार
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी अनेक वर्ष भाजपमध्ये सोबत काम केलं, पण आता खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने दोघांचे मार्ग वेगळे झाले. आता चावट शब्द वापरल्यामुळे खडसेंवर माफी मागण्याची वेळ आली.
'काही चुकीचं झालं तर लोक चावटपणाचे धंदे करतो का? असं म्हणतात. गिरीशभाऊंनी चावट शब्दाचा वेगळा अर्थ काढला, कारण त्यांच्या मनात चांगल्या भावना नसतातच. इकडे-तिकडे पाहण्याच्या ज्या वेगळ्या भावना असतात, त्यामुळे त्यांना तो चावटपणाचा अर्थ वाटला असेल. त्यांना जर चावटपणाचं दु:ख वाटत असेल, तर मी त्यांची माफी मागतो,' अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath khadse, Girish mahajan