नवी दिल्ली, 5 मे : कोरोना व्हायरसचा नायनाट करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. प्लाझ्मा थेरपी ही कुठलीही जादूची गोळी नाही. मोठ्या प्रमाणावर, नियंत्रित वातावरणात चाचण्या केल्यानंतरच त्याच्या प्रभावीपणावर शिक्कामोर्तब करता येईल, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कोरोना विषाणूमुळे गंभीर रुग्णांवर सध्या काही राज्यांनी प्लाझ्मा उपचार सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर हे मत महत्त्वाचे मानले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या आठवड्यात ही उपचार पद्धती सध्या प्रयोगांच्या पातळीवरच असल्याचा इशारा दिला होता.
दुसरीकडे, जगात अनेक देशांचे संशोधक लस तयार करण्याच्या कामात सरसावले असून काही देशात कोरोना लशींच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. लस तयार झाली तर कोरोनाची साथ लवकर संपुष्टात येऊ शकते. किमान शंभर संशोधन गट लस तयार करण्याचे काम करीत असून त्यांनी तयार केलेल्या लसींच्या चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. असे असले तरी कोरोना विषाणूवर प्रभावी लस तयार होईल याची कुठलीही हमी नाही.
दरम्यान, कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशात वैद्यकीय सामग्रीचा पुरेसा साठा तयार करता यावा यासाठी या विषाणूच्या फैलावाची आणि त्याच्या तीव्रतेची माहिती चीनने जगापासून दडवून ठेवली, असे अमेरिकन प्रशासनाचे ठाम मत झाले आहे. अमेरिकन गुप्तचरांनी 1 मे रोजी चार पानी अहवाल तयार केला असून, त्यात ही सर्व माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा -एका दिवसात दारू विक्रीतून किती महसूल जमा? आश्चर्यकारक आकडेवारी आली समोरकोरोनाचा जन्म वटवाघळांपासून नव्हे तर वुहान शहरातील प्रयोगशाळेत झाल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच जाहीरपणे म्हटले आहे. त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पेओ यांनाही त्यास दुजोरा देत, करोनाच्या फैलावास चीनच जबाबदार असून, त्याबद्दल या देशावर कारवाई केली पाहिजे, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकन गुप्तचरांचा हा अहवाल उघड झाला आहे.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.