मुंबई, 16 नोव्हेंबर : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. 18 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहा, असं समन्स ईडीने संजय राऊत यांना बजावला आहे. काहीच दिवसांपूर्वी संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाली आहे. पत्राचाळ गैरव्यवहाराच्या आरोपांखाली संजय राऊत यांना 100 दिवसांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये राहायला लागलं. एकीकडे ईडीने संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी बोलावलं आहे, तर दुसरीकडे ईडीने संजय राऊतांच्या जामिनाविरोधात सुधारित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. संजय राऊत यांचा जामिन रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मागच्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी सुधारित याचिका दाखल करण्याचे निर्देश ईडीला दिले होते. या याचिकेवर 25 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. ईडीच्या सुधारित याचिकेत काय आहे? - कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरण अत्यंत गंभीर असून राऊत यांचा जामीन रद्द करून पुन्हा कोठडी द्यावी. - या प्रकरणात पैशांच्या गैरव्यवहारांची लिंक अर्थात मनिट्रेल आम्ही कोर्टात सिद्ध करूनही, कोर्टाने त्याचा विचार केला नाही. - निकाल देताना कोर्टाने पीएमएलए सेक्शन 45 मधल्या तरतुदी विचारात घेतल्या नाहीत. - संजय राऊत हे या गुन्हा प्रकरणात जाणीवपूर्वक सक्रीय सहभागी होते. - संजय राऊत यांना जामीन मंजूर करताना कोर्टाने ईडीवर ओढलेले ताशेरे, आदेशातून रद्द करावेत आणि सुधारित आदेश द्यावा. कोर्टाने ईडीला फटकारलं संजय राऊत आणि प्रविण राऊत यांची अटक बेकायदेशीर आहे, असं मत न्यायलयाने नोंदवलं, तसंच ईडीने आपल्या मर्जीतील आरोपी निवडले. मुख्य आरोपी असलेल्या राकेश सारंग, एचडीआयएल, म्हाडा आणि सरकारी अधिकाऱ्यांना ईडीने अटक केली नाही, ईडीने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचं परखड मतही न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन देताना मांडलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







