अजित मांढरे, मुंबई, 1 ऑगस्ट : पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांना विशेष ईडी न्यायालयाने (ED Court) 4 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने केलेल्या तपासात प्रथमदर्शनी संजय राऊत यांचा सहभाग असल्याचं आढळून येत आहे, असं मत न्यायाधिशांनी मांडलं. वकील हितेन वेणेगावकर यांनी ईडीकडून तर वकील अशोक मृंदरगी यांनी संजय राऊत यांच्याकडून बाजू मांडली. कोर्टात काय झालं? पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी काल सकाळी ईडीने संजय राऊत यांच्या घरावर धाड टाकली, यानंतर दिवसभर चौकशी केल्यानंतर त्यांना ईडीने ताब्यात घेतलं, यानंतर रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आली. दुपारी 2 वाजता संजय राऊत यांना कोर्टात आणण्यात आलं. 2.15 मिनिटांनी त्यांना कोर्टाच्या रूम नंबर 16 विशेष ईडी न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीच्या वकिलांचे गंभीर आरोप? सुनावणीला सुरूवात झाल्यानंतर ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी युक्तीवादादरम्यान गंभीर आरोप केले. प्रविण राऊत पत्रा चाळीची डेव्हलपमेंट पाहत होता. त्याला HDIL कडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातले 1 कोटी 6 लाख 44 हजार वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. संजय राऊत आणि वर्षा राऊत यांना परत प्रविण राऊतने 37 कोटी दिले, नंतर त्यातून त्यांनी दादरमध्ये फ्लॅट घेतला, असा दावा ईडीच्या वकिलांनी केला. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. अलिबाग येथे विकत घेतलेली जमीन याच पैशातून खरेदी करण्यात आली. प्रविण राऊत फक्त नावाला होता, तो संजय राऊत यांच्या वतीने सर्व व्यवहार करत होता, मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो किंवा दादरमधलं घर आणि अलिबागची जमीन, हे सगळं संजय राऊत यांच्या सांगण्यावरून करण्यात आलं, असाा आरोप ईडीने कोर्टामध्ये केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.