सिंधुदुर्ग, 4 फेब्रुवारी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडी यात्रेत भराडीदेवीचं दर्शन घेतलं. देवीच्या दर्शनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेतली, या सभेत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. महाविकासआघाडी सरकारने कोकणासाठी काहीच केलं नाही. दोन चक्रीवादळं येऊन गेली, पण नुकसान भरपाईची कवडीही दिली गेली नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
'कोकणात रिफायनरी आणणार होतो. आजपर्यंत भारताच्या इतिहासात सर्वात मोठी 3 लाख कोटींची गुंतवणूक कोकणात येणार होती. सरकारी कंपन्या ही गुंतवणूक करणार होत्या. 1 लाख लोकांना रोजगार मिळणार होता, पण यांनी खोटं बोलून लोकांना भडकवलं,' अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर केली आहे.
'खोटं बोलून चांगल्या प्रोजेक्टला विरोध केला. आपलं सरकार आलं नसतं तर हा प्रोजेक्ट तीन राज्यांमध्ये नेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता, पण तुमच्या आशिर्वादाने सरकार बदललं आणि केंद्राला सांगितलं हा प्रोजेक्ट महाराष्ट्राला हवा आहे. आमच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. या एका प्रोजेक्टमुळे महाराष्ट्राच्या पुढच्या 20 वर्षांची वाटचाल सुदृढ होणार आहे. रिफायनरीचा प्रकल्प आणणारच,' असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
LIVE | आंगणेवाडी भराडी देवी यात्रा व आनंदोत्सव सभा | सिंधुदुर्ग https://t.co/q7pqDgjaXx
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 4, 2023
येत्या अर्थसंकल्पामध्ये कोकणाला भरभरून देऊ, असं आश्वासनही अर्थमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी दिलं, तसंच पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये इथला आमदार आणि खासदार भाजप-बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा असेल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis