एक घटना आणि उद्धव ठाकरेंवर भाजपच्या 5 नेत्यांनी केला घणाघाती शाब्दिक हल्ला

एक घटना आणि उद्धव ठाकरेंवर भाजपच्या 5 नेत्यांनी केला घणाघाती शाब्दिक हल्ला

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी ठाकरे सरकारवर खरमरीत टीका केली.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या या निर्णयानंतर लॉकडाऊन संपताच आपल्या गावी परतण्याच्या तयारीत असलेले परराज्यातील मजूर थेट रस्त्यावर उतरले. यातूनच वांद्रे स्टेशनबाहेर मोठी गर्दी जमली होती. या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

कोरोना दूर ठेवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग गरजेचं असताना हजारो मजूर एकत्र आल्यानंतर भाजपने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. भाजपकडून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी ठाकरे सरकारवर खरमरीत टीका केली.

कोण काय म्हणालं?

देवेंद्र फडणवीस -

"बांद्य्रामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. अशा स्थितीतही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल तर ते आणखी दुर्दैवी आहे. कोरोनाविरूद्धचा लढा हा राजकीय नाही, हे कृपया आतातरी लक्षात घ्या. हा लढा आपल्याला गांभीर्यानेच लढावा लागेल, ही पुन्हा एकदा माझी कळकळीची विनंती आहे. रेशनकार्ड नसलेल्यांना धान्य द्या,असे सांगतोय. मा.पंतप्रधान सुद्धा वारंवार सांगताहेत की,रेल्वे सुरू केल्या तर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होणार नाही,त्यामुळे आपले कोरोनाविरूद्धचे युद्ध कमकुवत होईल. सध्या जे जेथे आहेत,तेथेच त्यांची व्यवस्था करणे,याला सर्वोच्च प्राधान्य हवे."

चंद्रकांत पाटील -

"वांद्य्रातील घटना सर्वांसाठी चिंता वाढवणारी आहे. राज्य सरकारने गरीब कुटुंबांना, परराज्यातील मजुरांना निवाऱ्याची व्यवस्था, रेशनवर धान्य आणि भोजन व्यवस्था केली असती, तर ही गर्दी झाली नसती."

आशिष शेलार -

"हजारो मजूरांनी एकत्र येत केलेलं आंदोलन हे राज्य सरकारच्या गुप्तचर यंत्रणेचं सपशेल अपयश आहे. हे मजूर वांद्रे, खार आणि सांताक्रूज या भागातून आले होते. मागच्या आठवड्यातही त्यांनी असेच आंदोलन केले होते."

किरीट सोमय्या -

"हे मजूर इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्र कसे आले, हे ठाकरे सरकार स्पष्ट करेल काय? यांची गुप्तचर यंत्रणा काय करत होती? हे लोक नेमके कुठून आले? जमावबंदी लागू असतानाही इतके लोक एकत्र कसे आले? लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पोलिसांनी 4 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येऊ दिलं नाही. मग आता कसे आणि का दिले?"

नितेश राणे -

"आज जे वांद्र्यामध्ये दिसले ते उद्या मुंबई मध्ये राहणारे कोकणातले लोक पण असू शकतात. सरकार त्यांना आप-आपल्या गावी जाऊ नका असं सांगत आहे, पण मुंबई मधल्या 10 बाय 10 च्या खोलीत त्यांना धान्य तरी सरकारनी द्यावे नाहीतर त्यांचाही असाच उद्रेक होईल! मुख्यमंत्री सतत बोलत आहे जिथे आहात तिथेच रहा सरकार तुमची काळजी घेईल. असं होत नाही आहे म्हणूनच उद्रेक होत आहे."

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 15, 2020, 9:00 AM IST

ताज्या बातम्या