मुंबई, 18 ऑगस्ट : दहीहंडीला (Dahi Handi) खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गोविंदा आणि पथकांकडून करण्यात येत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची ही मागणी पूर्ण केली आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळाल्यामुळे गोविंदांनाही याचा फायदा होणार आहे.
खेळाचा दर्जा मिळाल्यामुळे गोविंदांना राज्य सरकारने सरकारी नोकरीत खेळाडूंसाठी दिलेल्या 5 टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय 18 वर्षांवरील कॉलेजमध्ये जाणाऱ्या गोविंदांना ग्रेस मार्कही मिळू शकतात. तसंच थर लावण्याचा सराव करायचा असल्यास गोविंदांना कॉलेजच्या वेळेतूनही जायची परवानगी मिळू शकेल.
गोविंदांसाठी मुख्यमंत्र्यांच्या घोषणा
दहीहंडीमध्ये सहभागी झालेल्या गोविंदांना विमा कवचही मिळणार आहे. दुर्देवाने एखाद्याचा मृत्यू झाला तर आपण 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच जबर जखमी झाला तर त्याला साडेसात लाख रुपये आणि हात-पाय मोडला किंवा फॅक्चर झाला तर पाच लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विम्याबाबतचा निर्णय फक्त या वर्षीसाठी लागू असेल.
दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात विम्याचा प्रिमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
गोविंदा उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करुन प्रो गोविंदा म्हणून स्पर्धा राबवाव्यात. राज्य शासनाकडून या स्पर्धा चालू केल्यानंतर बक्षीसं हे राज्य शासनाकडून मिळतील, अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde