इम्तियाज अहमद, प्रतिनिधी
धरणगाव, 3 जुलै : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव (Dharangaon Jalgaon District) शहरातील बस स्थानकाच्या शेजारी लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) आज दोन तरुणांमध्ये हाणामारी झाली आहे. लसीकरण केंद्रावर नंबर लावण्यावरून ही हाणामारी (Clash at Vaccination center) झाली आहे. दरम्यान, ढिसाळ नियोजनामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होत असून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार सुज्ञ नागरिक करत आहेत.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहेत. तरुण आणि वयोवृद्ध नागरिक एकत्र लसीकरणाला येत असल्याने मोठी गर्दी होत असून नियोजनाअभावी गोंधळ उडत आहे. याचा फटका नागरिकांना बसत असून आज दोन जणांमध्ये चक्क हाणामारी झाली आहे. या गोंधळामुळे काही काळ लसीकरण ठप्प झाले असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासन आल्यानंतर काही वेळाने लसीकरण सुरू झाले.
धरणगावातील लसीकरण केंद्रावर जोरदार हाणामारी#Jalgaon #Dharangaon #VaccinationCenter pic.twitter.com/7mqmUVHj72
— News18Lokmat (@News18lokmat) July 3, 2021
ठाण्यातही लसीकरण केंद्रावर जोरदार राडा
कोरोनावर मात करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस नागरिकांना उपयोगी ठरत आहे. त्यामुळे नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान ठाण्यात एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. ठाणे मनपाच्या लसीकरण केंद्रावर स्थानिक नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाल्याचं समोर आलं.
शिवाई नगर येथील नगरसेवकीच्या पतीने आदल्या दिवशी काही नागरिकांना कुपन वाटले होते. हे कुपन घेऊन आज नागरिक लसीकरणासाठी दाखल झाले मात्र त्याचवेळी वॉक इन लसीकरणासाठीही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अशा परिस्थितीत नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
वॉक इन आलेल्या नागरिकांना परत पाठवले जात असल्याने स्थानिक नागरिक आणि नगरसेवक, त्यांचे कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. याच दरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी एकमेकांना भिडल्याचंही पहायला मिळालं. एकूण राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांच्या श्रेयवाद हा चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Jalgaon