वसई, 25 मार्च : कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. दररोज नवीन रुग्णांची यात भर पडत आहे. देशभरात लॉकडाउन जाहीर झालं आहे. पोलीस आपला जीव धोक्यात घालून लोकांना घरात राहण्यास सांगत आहे. पण, वसईमध्ये एका तरुणाने पोलिसांवरच गाडी घालून जखमी केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
मुंबई जवळील नालासोपाऱ्यात एका दुचाकी स्वाराने पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी घातल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा -या कर्मचाऱ्यांना बसणार कोरोनाची मोठी झळ, मार्च महिन्याचा पगार कापणार
सरकारने जारी केलेल्या संचारबंदीमध्ये नालासोपारा पूर्वेकडील पेल्हार रोड वाकण पाडा इथं नाकाबंदी करण्यात आली आहे. यावेळी एक मोटारसायकलस्वार वेगाने येत असता त्याला पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील यांनी गाडी थांबवण्यासाठी सांगितली. पण, या तरुणाने थेट पाटील यांच्या अंगावर गाडी घातली. यात पाटील यांना डोक्याला, हाताला जबर मार बसला असून नालासोपाऱ्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या प्रकरणी तरुणाला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.
अमरावतीत संचारबंदीत तरुणांना प्रसाद
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली असताना सुद्धा विनाकारण घराबाहेर पडणाऱ्याना आता पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागणार आहे. संचारबंदी असून देखील घराबाहेर पडणाऱ्या, शहरात फिरणाऱ्या दुचाकी स्वारांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा हा वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आवाहन करूनही रस्त्यावरील गर्दी कमी होत नाही आहे. त्यामुळे संचारबंदी लागू झाली आहे.
हेही वाचा - संचारबंदी आणि लॉकडाऊनमध्येही कोरोनाचं थैमान थांबेना? महाराष्ट्रातील आकडा वाढला
यात अत्यावश्यक सेवा वगळता काम नसताना फिरणाऱ्यांवर आता पोलिसांकडून कारवाई होताना दिसत आहे. आज अमरावतीच्या राजकमल, चित्रा चौकात अनेक दुचाकी स्वारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. सोबत पोलिसांनी चांगलाच चोप दिल्याने दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. ग्रामीण भागात देखील काम नसताना फिरणाऱ्यांना चांगलाच प्रसाद दिला. शहरात अत्यावश्यक वस्तूंची खरेदी साठी सकाळी 8 ते 12 पर्यंत नागरिकांना सूट दिल्याचे पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.