मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'कोरोना'मुळे कोंबडी झाली चारण्याची आणि मसाला बाराण्याचा!

'कोरोना'मुळे कोंबडी झाली चारण्याची आणि मसाला बाराण्याचा!

कोरोना व्हायरसमुळे चिकन विक्रेत्यांवर दर कपातीची मोठी कुऱ्हाड कोसळली.

कोरोना व्हायरसमुळे चिकन विक्रेत्यांवर दर कपातीची मोठी कुऱ्हाड कोसळली.

कोरोना व्हायरसमुळे चिकन विक्रेत्यांवर दर कपातीची मोठी कुऱ्हाड कोसळली.

  • Published by:  sachin Salve

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 07 मार्च : चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला अशा आशयाची एक म्हण आहे. आणि हीच म्हण शब्दशः सत्यात उतरली आहे. कोरोना व्हायरसमुळे चिकन विक्रेत्यांवर दर कपातीची मोठी कुऱ्हाड कोसळली.

नाशिकच्या सर्वच चिकन मार्केटमध्ये ४० ते ५० रुपये किलो चिकनचे दर आहे. चीनमधील कोरोना व्हायरस संसर्ग आणि चिकनचा संदर्भ जोडला गेल्यानं चिकन विक्रीवर याचा मोठा परिणाम झाला आहे.

चिकन दर दुकानागणिक बदलले आहे. चिकन अगदी स्वस्त दरात मिळू लागले आहे. कोरोना आणि चिकन दूर दूर पर्यंत काहीही संबंध नसल्याचं चिकन विक्रेते सांगून सांगून थकले आहे. मात्र, तरी देखील चिकन पेक्षा कोरोनाचाच प्रभाव लोकांच्या मनात अधिक झाला आहे. त्यामुळे चिकन विक्रेत्यावर हतबल होऊन अक्षरशः ऑफर देण्याची नामुष्की ओढवली आहे. कोरोना आजार येण्यापुर्वी जे चिकन 150 ते 200 रुपये किलो होत तेच चिकन 40 आणि 50 रुपये किलोने विकण्याची नामुष्की चिकन विक्रेत्यांवर आली आहे.

एकंदरीतच कोरोनाच्या दहशतीमुळे अनेक घटकांबरोबर चिकन विक्रीला देखील फटका बसलाय हे निश्चित. मात्र, याच परिस्थितीवर चिकनच्या दरापेक्षा चिकनची भाजी जास्त खर्चिक झाली ही सत्य परिस्थिती नाकारून चालणार नाही. त्यामुळे नाशिकमध्ये चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला ही म्हण प्रत्यक्षात उतरली आहे.

शेतकऱ्यावर 7 लाखांच्या कोंबड्या केवळ 90 हजारांत विकण्याची वेळ!

दरम्यान, चिकनमुळे कोरोना व्हायरस होत असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरल्याने पोल्ट्री व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. वाशिम जिल्ह्यातही ब्रॉयलर चिकनकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन त्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.

मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील तेजस सानप यांनी मागील दहा वर्षांपासून पोल्ट्री व्यवसाय सुरू केला होता. आज त्यांच्याकडे तीन हजार पाचशे पक्षी असून कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे ग्राहक मिळत नसल्यानं या शेतकऱ्याला 7 लाखांचा माल केवळ 90 हजारांत विकण्याची वेळ आली आहे. मात्र, त्या किमतीत ही ग्राहक मिळत नसल्याने तेजस सानप हताश झाले आहेत. तेजस सानप यांच्याकडील कोंबडीचं वजन 3 ते साडे तीन किलोपर्यंत झालं आहे.

70 ते 80 रुपये प्रति किलो असलेले दर आता 10 रुपये करूनही त्यांच्यावर ग्राहक शोधण्याची वेळ आली आहे. मागील दोन दिवसांपूर्वी खाद्य नसल्याने 500 कोंबड्या जंगलात सोडून दिल्या होत्या. तसेच उर्वरित कोंबड्या जंगलात सोडण्याच्या विचारात होतो. मात्र, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेऊन कोंबड्यासाठी खाद्य आणलं व त्या आतापर्यंत जगवल्या आहेत. मात्र यापुढे पैसा नसल्यानं खाद्य आणणे शक्य होणार नाही. या कोंबड्यांना जंगलात सोडल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं तेजस सानप यांनी सांगितलं. पोल्ट्री व्यवसायावरच तेजस सानप यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे त्यांचा पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडल्यानं त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. त्यांना यातून सावरण्यासाठी शासनस्तरावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

वाशिम जिल्ह्यातील बहुतांश शेती कोरडवाहू असल्यामुळे शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. मात्र, कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करणारे शेतकरी कोरोना व्हायरससारख्या नव्या संकटांमुळे अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

First published:

Tags: China, Coronavirus