'चला मावळ्यांनो...ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे', संभाजीराजेंनी दिला कोरोनाला हरवण्याचा मंत्र

'चला मावळ्यांनो...ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे', संभाजीराजेंनी दिला कोरोनाला हरवण्याचा मंत्र

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही लोकांना संयमाचं आवाहन केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 24 मार्च : महाराष्ट्रात आणि देशात कोरोना व्हायरसचा (coronavirus) प्रादुर्भाव वाढत चालत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मान्यवरांकडून लोकांना गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje Chhatrapati) यांनीही लोकांना संयमाचं आवाहन केलं आहे. 'छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रूविरुध्द लढताना संयमाने, धीराने, आणि युक्तीने मात केली आहे. आपणही सर्वजण या करोना शत्रूला हरवू शकतो,' असं संभाजीराजे म्हणाले.

'चला मावळ्यानो हि लढाई आपल्याला जिंकायचीच आहे! आपण एक सुज्ञ, जबाबदार नागरिक आहोत हे दर्शवण्याची ही एक संधी आहे. यासाठी सरकारने दिलेल्या सुचना काटेकोर पणे पाळा. उगाचंच निष्काळजी राहु नका. गर्दीत जाण्याचे टाळा. घराबाहेर पडू नका,' असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे.

उदयनराजेंकडूनही आवाहन

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचे काही नवे रुग्ण सापडल्यानंतर काल उदयनराजे भोसले यांनी नागरिकांना सहकार्याचं आवाहन केलं होतं. 'सातारा, सांगली येथे कोरोना रुग्ण सापडले असले तरी लोकांनी घाबरून, गडबडून जाऊ नये. लक्षात ठेवा संघर्ष आपल्या सर्वांच्या रक्तात आहे. आपले प्रशासन या रोगाचा निपटारा करण्यासाठी मोठ्या हिमतीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे त्यांना आपल्या सर्वांच्या सहकार्याची नितांत गरज आहे,' असं उदयनराजे म्हणाले.

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या शंभरीपार

राज्यात काल रात्रीपासून कोरोनाच्या 18 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 107 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे 6, सांगली मधील इस्लामपूरचे 4, पुण्याचे 3, सातारा जिल्ह्यातील 2 तर अहमदनगर, कल्याण - डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. या नवीन बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे 8 रुग्णांनी मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रवास केला आहे. तर इतर काही जणांनी अमेरिका, इंग्लंड आणि पेरु या देशात प्रवास केला आहे. दोन जण पूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे निकट सहवासित आहेत असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2020 07:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading