मुंबई, 16 मार्च: आटोक्यात आली असं वाटत असतानाच महाराष्ट्रात कोरोनाची साथ (Covid-19 Pandemic in maharashtra) पुन्हा बेसुमार वाढते आहे. यावेळी फक्त मुंबई, पुण्यातच नव्हे तर राज्याच्या इतर भागात, अंतर्गत भागातही विषाणूने (Coronavirus Maharashtra updates) शिरकाव केला आहे. महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य (Maharashtra covid task force) डॉ. शशांक जोशी यांनी ही साथ आटोक्यात आणण्यासाठी तातडीने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आणि लोकांच्या मनोवृत्तीत बदल करण्याची गरज व्यक्त केली आहे. या टास्कफोर्सने कोरोना विषाणू एवढ्या झपाट्याने का वाढतोय याचं कारणही स्पष्ट केलं आहे.
डॉ. शशांक जोशी यांनी CNBC ला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातला कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरणारा आहे. खूप कमी वेळात साथ पुन्हा एकदा वाढल्याचं दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना विषाणूला दूर ठेवण्यासाठीचं सोशल डिस्टन्सिंग, मास्क या गोष्टी पाळल्याच पाहिजे.
डॉ. शशांक जोशी यांनी कोरोना रुग्ण वाढण्यामागे नागरिकांची मनोवृत्ती असल्याचं स्पष्ट केलं आहे.
का वाढतोय कोरोना?
कोविड नियम लोक गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. रेस्टॉरंट्समध्ये विनामास्क जाणारे नागरिक हे कोरोनाच्या प्रसारामागचं प्रमुख कारण असल्याचं डॉक्टर सांगतात.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी सज्ज राहा, केंद्राचा राज्य सरकारला धोक्याचा इशारा
अशाच प्रकारे नागरिक निष्काळजीपणा करत राहिले तर साथ आटोक्यात ठेवणं कठीण होईल.
कोरोना होऊन गेला आणि माणूस त्यातून बरा झाला की शरीरात आपोआप त्या विषाणूशी लढायला अँटिबॉडीज तयार होतात. कोरोना लशीमुळे नेमकं हेच कार्य होतं. शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. Coronavirus शी लढायला अँटिबॉडीज तयार होतात. पण या अँटिबॉडिज कायम शरीरात राहात नाहीत.
लस घेतली म्हणून निर्धास्तपणे फिरू नका
महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना केसेसमध्ये समोर आलेली आणखी एक बाब म्हणजे अँटिबॉडीजची संख्या झपाट्याने कमी होते आहे. एकदा या विषाणूचा हल्ला परतवून लावला तरी पुन्हा कोरोनाची लागण झालेले रुग्ण दिसू लागले आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हलगर्जीपणा करून चालणार नाही.
24 तासांत गंभीर कोरोना रुग्ण 92वरून 4,219 वर; आणखी एक नवा स्ट्रेन आढळल्याने खळबळ
कोरोना लसीकरण वाढलं, तसं लोकही बिनधास्त घराबाहेर पडू लागले आहेत. पण लस घेतल्यानंतरही कोरोना नियम पाळावेच लागतील. लशीचा परिणाम लगेच सुरू होत नाही. शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे लसीकरणानंतर 2 महिने काळजी घेत राहणं आवश्यक आहे, असंही जोशी यांनी सांगितलं.
उच्चभ्रू वस्तीत वाढला कोरोना
मुंबईच्या उच्चभ्रू भागात कोरोना रुग्ण वाढले आहेत. त्यामानाने धारावीसारख्या झोपडपट्टी भागात दाटीवाटीच्या वस्तीत कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते तिथे मात्र आता नव्या लाटेत फारसे रुग्ण नाहीत. याचा अर्थ अधिक एक्सपोझ झालेल्या भागापेक्षा अद्याप कोरोनापासून दूर राहिलेल्या भागात कोरोना विषाणूने या वेळी हल्ला केलेला दिसतो.
त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे यावेळी कोरोना बळींची संख्या प्रचंड नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.