• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • लॉकडाऊनची व्याप्ती वाढली, नियम कडक करण्यासाठी आणखी दोन जिल्ह्यांनी घेतला निर्णय

लॉकडाऊनची व्याप्ती वाढली, नियम कडक करण्यासाठी आणखी दोन जिल्ह्यांनी घेतला निर्णय

कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेत मोठ्या शहरातील अनेक महापालिकांनी पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.

  • Share this:
जालना, 3 जुलै : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेत मोठ्या शहरातील अनेक महापालिकांनी पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता महाराष्ट्रातील इतर काही जिल्ह्यांनीही हाच मार्ग पत्करला असून पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जालना जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे, तर दुसरीकडे उस्मानाबादमध्ये प्रत्येक शनिवारी जनता कर्फ्यूबाबत घोषणा करण्यात आली आहे. जालन्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी उशिरा का होईना जिल्हा प्रशासनाला अखेर शहाणपण सुचलं असून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक घेत रविवारपासून जालन्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी घेतला आहे. जालन्यात कोरोनाने रौद्ररूप धारण केले असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी तब्बल साडेसहाशेचा टप्पा गाठला आहे, तर आतापर्यंत 21 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. जालनेकर विनाकारण मोठ्या संख्येने बाजारात फिरत असून वाढत्या वर्दळीमुळे कोरोना संसर्गाचं धोका अधिक असल्याने जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात यावी अशी मागणी जालनेकर सोशल मीडियाच्या माध्यमातून करत होते. दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी एक फर्मान काढत नवीन जालना आणि जुना जालनाला जोडणारे सर्व पूल सील केले होते. ज्यामुळे दैनंदिन कंकजसोबतच जीवनावश्यक सेवेसाठी देखील जालनेकरांन अनेक अडचणी येत आहेत. फक्त पूल जरी सील केले असले तरी बायपासच्या माध्यमातून जालनेकरांची वर्दळ कायमच आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत रविवारपासून जालन्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा लॉकडाऊन 7 ते 10 दिवसांपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून यासंदर्भातील गाईडलाईन्स लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. उस्मानाबादमध्ये जनता कर्फ्यू उस्मानाबाद जिल्ह्यात येथून पुढे दर शनिवारी जनता कर्फ्यू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र तुर्तास तरी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला नाही. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 246 वर गेल्यावर प्रशासनाला जाग आली असल्याचं बोललं जात आहे. कोरोना संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. तसंच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. संपादन - अक्षय शितोळे
First published: