चंद्रकांत बनकर, खेड, 30 जानेवारी : धोकादायक कोरोना व्हायरसने सध्या सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. त्यातच वैद्यकीय शिक्षणासाठी चीनमधील नानटॉन्ग युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील तीन विद्यार्थिनींचे भुकेने हाल होत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
खेडमधील मुली चीनच्या ज्या विद्यापीठात शिक्षण घेतात तेथील हॉस्टेलमध्ये त्या राहतात. तेथील मेसमधील जेवणदेखील संपलं आहे. तसंच या मुलींना बाहेर कोठेही जाण्यासदेखील प्रतिबंध घालण्यात आला आहे. खेडमधील सादिया बशीर मुजावर, जोया हमदुले, समिना मुनीर हमदुले अशा या तीन विद्यार्थिनींची नावे आहेत.
बुधवारी मध्यरात्री त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर या तिघींचेही पालक मोठ्या चिंतेत असून त्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांच्याशी भेटून त्यांनी सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर श्री सोनोने यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून भारत दूतावासाशी संपर्क करून त्यांना योग्य ती मदत मिळण्यासाठी आता प्रयत्न सुरु केले आहेत.
बशीर मुजावर आणि कौसर मुजावर हे दोघेही खेड नगर पालिकेचे माजी नगरसेवक आहेत. एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी त्यांची मुलगी सादिया हिला गेल्या वर्षी शांघाई पासून 250 किलोमीटरवर नांटोक विद्यापीठात पाठवले. तिच्यासोबत खेडमधीलच कर्जी गावातील जोया आणि समीना या मैत्रिणीदेखील चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.
'कानून के हाथ लंबे होते हैं!' 8 शहरांमध्ये मोटारसायकल चोरणारी अट्टल टोळी पोलिसांच्या जाळ्यात
खेडमधून शिक्षणासाठी चीनमध्ये गेलेल्या तीनही मुली विद्यापीठाच्या एकाच रूममध्ये राहतात. त्यांना भारतीय जेवणाची मेसदेखील आहे. मात्र या कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून बाहेरील सर्व आयात आणि निर्यातीवर देखील प्रतिबंध झाला आहे. त्या मुलींना जेवणाचे साहित्य खेडमधून पाठवले जायचे. मात्र तेही बंद झाले आहे. त्यांच्या मेसमधील जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा झाला असल्याचे त्या मुलींनी खेड मधील आपल्या पालकांना सांगितले आहे.
विद्यापीठ परिसराच्या बाहेर पडण्यासदेखील प्रतिबंध असल्याने या मुलींचे भुकेने चांगलेच हाल होत असल्याचे समजते. चिंतीत पालकांनी आज खरडच्या प्रांत अधिकाऱ्यांची भेट घेतली. सर्वांची सविस्तर माहिती त्यांना दिली. प्रांत अधिकारी अविषकुमार सोनोने यांनी तात्काळ जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी संपर्क करत घडलेली हकीकत सांगितली. त्या सर्व विद्यार्थिनींची माहिती चीनमधील भारतीय दुतावासात पाठवून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.