राज्यात Corona चे Active रुग्ण वाढले; 25 दिवसांनी नव्या रुग्णांची संख्या बरे झालेल्यांपेक्षा अधिक

राज्यात Corona चे Active रुग्ण वाढले; 25 दिवसांनी नव्या रुग्णांची संख्या बरे झालेल्यांपेक्षा अधिक

Coronavirus daily update Maharashtra गेल्या जवळपास महिनाभरात पहिल्यांदाच दैनंदिन आकडेवारीत नव्या कोरोना रुग्णांची संख्या बऱ्या झालेल्या रुग्णांच्या तुलनेत वाढलेली दिसली. गेल्या 24 तासांत 5,760 नव्या रुग्णांचं निदान झालं.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर :  दिवाळीच्या काळातल्या गर्दीचा परिणाम मुंबई, ठाणे, पुणे आणि सगळ्याच मोठ्या शहरांवर दिसू लागला आहे. राज्यातली कोरोना रुग्णांची (Covid-19) संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या जवळपास महिनाभरात पहिल्यांदाच दैनंदिन आकडेवारीत नव्या कोरोना रुग्णांची संख्या बऱ्या झालेल्या रुग्णांच्या तुलनेत वाढलेली दिसली. (Coronavirus daily update Maharashtra) गेल्या 24 तासांत 5,760  नव्या रुग्णांचं निदान झालं. 4,088 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात 62 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात 79,873 अॅक्टिव्ह रुग्ण झाले आहेत. ही संख्या गेल्या आठवड्यात पन्नास हजारांच्या खाली आली होती. पण 18 नोव्हेंबरपासून दररोज नव्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. महाराष्ट्राचा कोरोनाचा आलेख उतरत होता, तो पुन्हा या आठवड्यात वर चढू लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबई, ठाणे परिसरातल्या शाळा सुरू होणार होत्या. त्या आता डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होणार नाहीत. पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या शाळा सुरू होणार आहेत. तिथे अद्याप कोरोनाचा आलेख चढलेला नाही. पण शहरात मात्र गेल्या महिन्याभरातला सर्वांत मोठा आकडा शनिवारी समोर आला. राजधानी दिल्लीनंतर आता पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह पेशंट्स पुणे जिल्ह्यात आहेत. ही संख्या 17048 एवढी आहे. त्याखालोखाल ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात उपचाराधीन रुग्ण (Active corona patients) अधिक आहेत.

पुण्यात आज 4396 जणांची चाचणी करण्यात आली. त्यातील 443 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मागील महिनाभरातील एकाच दिवसात आढळणारी कोरोनाबाधितांची ही सर्वाधिक संख्या आहे.

29 ऑक्टोबरपासून पुण्यात Corona रुग्णांची दैनंदिन संख्या 380 पेक्षा कमी राहिली आहे. गेल्या काही दिवसात तर दीडशेच्या आत नव्या रुग्णांची नोंद होत होती. पण गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चित्र बदलू लागलं आहे. दिवाळीपूर्वी पुण्याच्या बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला होता. लोकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झाल्याने तुफान गर्दी करत पुणेकरांनी निष्काळजीपणा केला.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 21, 2020, 10:35 PM IST

ताज्या बातम्या