मुंबई, 23 मार्च : करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांच्या उपस्थितीत सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत व्हिडीयो काँनफरसिंगद्वारे बैठक झाली.
राज्यात 144 कलम लागू केल्यानंतर याचं अनेक ठिकाणी उल्लंघन होत आहे. तसंच करोनाग्रस्त रुग्णांच्या वाढते संख्येमुळेही आता सरकार आणि प्रशासनासमोर आव्हान उभं राहिलं आहे. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आज सरकार कडून दिले जाण्याची शक्यता आहे. तसंच करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणखी काय उपाय योजना जाहीर केले जातात का, हे आता पहावं लागणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर संचारबंदी होणार?
कलम 144 लागू करून जमावबंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतरही राज्यातील रस्त्यांवरील गर्दी कमी होण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे राज्यात थेट संचारबंदी करण्यात येऊ शकते. अशा स्थितीत महत्त्वाचं काम सोडून सर्वसामान्यांना रस्त्यावर फिरता येणार नाही. संचारबंदीबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही मागणी केली आहे. मात्र अद्याप सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलेला नाही.
राज्यातून चिंताजनक आकडेवारी समोर
महाराष्ट्रात 24 तासांत तब्बल 15 रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 89 वर पोहोचली आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगान वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 396 वर पोहोचली आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत देशभरात 80 हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत.