पालघर, 9 एप्रिल: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाची दहशत पसरली आहे. कोरोनाची लागण होईल या भीतीने मयताच्या अंत्यसंस्कारालाही नातेवाईक येत नसल्याचं चित्र सध्या दिसत आहे. अशीच एक घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे.
नांदगाव येथे रक्ताच्या आजाराने एका 28 वर्षीय महिलेचं निधन झालं. महिला कोरोना झाला असेल, आपल्यालाही कोरोना होईल, या भीतीपोटी तिच्या अंत्यसंस्कारासाठी एकही नातेवाईक आणि गावकरी पुढे आला नाही. अखेर नांदगावच्या सरपंचांनी पुढाकार घेत काही तरुण एकत्र येत मृत महिलेवर अंत्यसंस्कार केला.
हेही वाचा.. धक्कादायक: राज्यात एका तासाला एक कोरोनाबाधिताचा मृत्यू, रुग्ण संख्याही वाढली
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नांदगावच्या पालवी पाड्यातील ही घटना आहे. गणेशा गणेश पारधी (वय-28) ही महिला गेल्या दीड वर्षापासून रक्ताच्या आजाराने पीडीत होती. मंगळवारी (ता.07) रात्री त्यांचा भिवंडीच्या इंडिरा गांधी रुग्णालयात मृत्यू झाला.आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर भिवंडी वरून त्यांचा मृतदेह शववहिनीतून नांदगावला आणला. कोरोना आजाराच्या भीतीपोटी मयत गणेशा पारधी यांचा मृतदेह गावात आणण्यास पालवी पाड्यातील गावकऱ्यांनी विरोध केला होता.
दु:खी कुटुंबाने मृतदेह कसाबसा घरात आणला. मात्र, नंतर पाड्यातील एकही गावकरी अंत्यसंस्कारासाठी पुढे आला नाही. एकढेच काय तर कोरोनाच्या धास्तीने नातेवाईकही आले नाहीत. गावकऱ्यांच्या असहकारमुळे मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडं मिळत नव्हती. त्यामुळे गणेश पारधी यांनी पत्नीचा मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा.. #Lockdown: युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मुलाने घरीच केली वडील आमदारांची कटिंग
अखेर नांदगावचे सरपंच पावन सवरा हे गणेश पारधी यांच्या मदतीला सरसावले. त्यांनी पुढाकार घेत सचिन डावरे, कैलास पवार आदी गावच्या तरुणांना एकत्र केले. पारधी कुटुंबाला धीर दिला. मनोरच्या बंद बाजारपेठेतील दुकानदाराला विनंती करून कफन आदी साहित्य आणले. गावात जाऊन लाकडं जमा करून वाहनाने स्मशानभूमीत पोहोचवली. त्यानंतर पारधी कुटुंब आणि सरपंचांसह गावातील काही तरुणांनी मयत महिलेचा मृतदेह स्मशानभूमीत आणून आदिवासी परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
संपादन- संदीप पारोळेकर