लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 11 एप्रिल : महाराष्ट्राला कोरोना व्हायरसचा विळखा पडला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. नाशिकमध्ये कोरोना झाल्याच्या भीतीमुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिकरोड येथील चेहडी पंम्पिंग स्टेशन जवळ ही घटना घडली आहे. 31 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. या तरुणाला गेल्या काही दिवसांपासून सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी आपल्या परिसरातील डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली. पण, तरीही सर्दी आणि खोकला काही कमी होत नव्हता, त्यामुळे डॉक्टरांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करण्यास सांगितले होते. हेही वाचा - बापरे! बीडमध्ये पेट्रोल 150 रुपये लिटर, त्यातही रॉकेल मिक्स मात्र, आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नाही ना, या भीतीने तरुणाला ग्रासले होते. त्यातूनच त्याने आज राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या तरुणाने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये कोरोना झाल्याची भीती व्यक्त करत आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. या तरुणाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस अधिक तपास करत आहे. अकोल्यात कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू दरम्यान, अकोल्यामध्ये एका कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे 7 एप्रिल रोजी या रुग्णाला अकोला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे हा रुग्ण पाच वाजेच्या सुमारास गळा कापलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये रक्तबंबाळ असल्याचे दिसून आला. हेही वाचा - कोरोनाव्हायरसची लस तयार करण्यासाठी लागणार आणखी 5 महिने, ‘या’ देशाने केला दावा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्याला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी या रुग्णाला वाचवण्याचा आटोकात प्रयत्न केला. परंतु, शस्त्रक्रिया सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. हा 30 वर्षीय रुग्ण मूळचा सालपडा जिल्हा नागाव, आसाम येथील रहिवासी आहे. शुक्रवारी 10 एप्रिल रोजी आलेल्या अहवालात हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत, असेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळवले आहे. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.