मुंबई, 08 जून: मागील दीड वर्षांपासून कोरोना विषाणूने जगभर थैमान (Corona pandemic) घातलं आहे. कोरोना विषाणूचा (Corona virus) उद्भाव झाल्यापासून शास्त्रज्ञ कोरोना विषाणूवर दिवस रात्र संशोधन (Research in Corona virus) करत आहेत. तरीही शास्त्रज्ञांना कोरोना विषाणूला पूर्णपणे समजून घेता आलं नाही. कोरोना विषाणूच्या म्युटेशनबाबत दररोज नवनवीन खुलासे संशोधनातून समोर येत आहेत. अलीकडेच झालेल्या एका संशोधनातून शास्त्रज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामुळे महाराष्ट्रासोबतचं देशाच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्यानंतर, देशाची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली होती. ज्यामुळे देशातील लाखो जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळले होते. अशातच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आढळलेल्या व्हेरिएंटबाबत केलेल्या संशोधनानुसार, महाराष्ट्रात कोरोना विषाणूने तब्बल 47 वेळा रंग बदलल्याची (Corona virus changes colour 47 times) धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणूच्या म्युटेशनमध्ये झपाट्याने बदल होतं असल्याची माहितीही संशोधकांनी दिली आहे. परिणामी कोरोना विषाणूची तिसरी लाट अत्यंत घातक असेल, असं भाकीतही शास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात आलं आहे. कोरोना विषाणूच्या सिक्वेन्सिगवरील हे महत्त्वपूर्ण संशोधन पुण्यातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV), भारतीय आर्युविज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) आणि नवी दिल्लीतील नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल (NCDC) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं आहे. गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत नागरिकांमध्ये नवनवे व्हेरिएंट आढळल्याचं उघडकीस आलं आहे. कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिवीर आणि स्टेरॉयडयुक्त औषधांचा अति वापर केल्यानं म्युटेशनमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचंही संशोधनात नमूद करण्यात आलं आहे. हे ही वाचा- तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज : सुरेश काकाणी नोव्हेंबर 2020 पासून ते 31 मार्च 2021 पर्यंतची एकूण 733 नमुने संशोधनासाठी गोळा करण्यात आले होते. या सर्व नमुन्यांमध्ये महाराष्ट्रात कोरोना विषाणूचं 47 वेळा म्युटेशन झाल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्याचा संभाव्य धोका वाढला आहे. महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिक या शहरांना कोरोना विषाणूचा धोका अधिक असेल असंही संशोधात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.