ऋचा कानोलकर, प्रतिनिधी मुंबई, 4 एप्रिल : राज्यात गेल्या सात दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंता वाढली आहे. कोरोना व्हायरसचा XBB 1.16 व्हेरिएंट रुग्णवाढीचं कारण ठरलाय. पण संख्या वाढत असली तरी कोरोनाबाधितांचा मृत्यूदर 1.8% असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.13% असल्यानं सध्या राज्यात दिलासादायक परिस्थिती आहे. रुग्णांचा आकडा वाढत असल्याने सरकारवर असलेली जबाबदारीही वाढलीय, सार्वजनिक आरोग्य विभाग सतर्क झालाय आणि रुग्णांच्या उपचारासाठी गरजेची उपकरणे, बेड, औषधं, ऑक्सिजनचा साठा आणि कोरोना प्रतिबंधक लशींचा साठा यामध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात मास्कसक्तीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ही रेट वाढणारे सहा जिल्हे सोलापूर - 22.8% सिंधुदुर्ग - 15.8% पुणे - 13.2% सांगली - 13.1% कोल्हापूर - 11.1% सातारा - 11% सक्रीय रुग्णांमध्ये दैनंदिन वाढ होणारे मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नागपूर, नाशिक, सांगली आणि सोलापूर हे आठ जिल्हे आहेत. लोकसंख्येचं प्रमाण या जिल्ह्यांमध्ये अधिक असल्याने फैलावही या जिल्ह्यांमध्ये जास्त होताना दिसतोय. सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा समोर आला असता सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालयात मास्कसक्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून दिले गेलेत. परंतु महाराष्ट्र आरोग्य विभागातर्फे कोणतेही निर्बंध अद्याप घातलेले नाहीत, राज्य सरकारकडून मास्कसक्तीही करण्यात आलेली नाही. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी न्यूज 18 लोकमतसोबत बोलताना राज्यातील कोविड परिस्थितीबाबत भाष्य केलं, राज्यात मास्कसक्ती केली नसून गर्दी असल्यास, आजार असल्यास मास्कचा आवर्जून वापर करावा असा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी दिला. श्वसनाचे किंवा इतरही आजार असलेल्या व्यक्तींनी गर्दीची ठिकाणं टाळावी असंही त्यांनी म्हटलं. वाचा - आठवड्यात 2 वेळेस खा पाणीपुरी, शरीरात होतील वेगळेच बदल; कळताच हैराण व्हाल! कोरोनाशी लढण्यासाठी राज्यांची कितपत तयारी आहे हे तपासण्याकरता नागपूर अधिवेशनादरम्यान कोविड मॉकड्रील करण्यात आलं,त्याचप्रमाणे पुन्हा एकदा मॉकड्रील करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून दिले गेलेत. नागपूर अधिवेशनावेळी केलेल्या मॉकड्रीलच्या अहवालानुसार महाराष्ट्रात उपलब्ध असलेली सुसज्ज यंत्रणा: 552 मेट्रिक टन ऑक्सिजन 370 LMD लिक्विड ऑक्सिजन टॅंक 56,000 जम्बो सिलिंडर 20,000 लहान सिलिंडर 1000 ड्युरा सिलिंडर 1589 कोविड रुग्णालयं 51,000 आयसोलेशन बेड्स 50,000 ऑक्सिजन बेड्स 15,000 आयसीयू बेड्स 9250 व्हेंटिलेटर्स नॉव्हेल कोरोना व्हायरस हा शब्द कानावर पडताच आजही धडकी भरते, कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं, देशात टाळेबंदी झाली, प्रवासावर मर्यादा आल्या, मास्कसक्ती झाली, कोरोनाबाधितांचे जीव गेले. आता हाच कोरोना व्हायरस पुन्हा लोकांच्या मनात भीती निर्माण करतोय. मात्र, कोरोनाबाबत भीती बाळगण्याची आवश्यकता नसल्याचं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलंय, ज्यानं महाराष्ट्रात दिलासादायक चित्र असल्याचं दिसतंय. वाचा - टॉवेल न धुता तुम्ही किती वेळ वापरू शकता? टॉवेलचं हे सत्य धक्कादायक विमानतळावर कोविड चाचण्या कोरोनाचा उद्रेक होण्याला महत्त्वाचं कारण ठरलं होतं ते परदेशातून भारतात आलेले प्रवासी,पुन्हा तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी मुंबई,नागपूर आणि पुणे या विमानतळांवर २ टक्के प्रवाशांच्या सध्या चाचण्या होतायत,येत्या काळात 50 ते 60 टक्के चाचण्या केल्या जातील आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यास 100 टक्के प्रवाशांच्या चाचण्या केल्या जातील असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये कोविड प्रतिबंधक लशींचा साठा वाढवला जातोय, रुग्णांच्या उपचारांसाठी लागणारी उपकरणं मुबलक प्रमाणात आहेत,रुग्णशय्यांची संख्या वाढवली जातेय, कोविड चाचण्यावर भर दिला जातोय, येणाऱ्या संकटासाठी महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे तयार आहे हे स्पष्ट झालं आहे.