सागर कुलकर्णी, मुंबई, 3 डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तयार झालेल्या राजकीय स्थितीमुळे राज्यात ऐतिहासिक आघाडीचा उदय झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे. मात्र पाच वर्षांत सहमतीने सरकार चालवण्याचं मोठं आव्हान या तीनही पक्षांसमोर असणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील मंत्र्यांना घराचे वाटप करण्यात आलं आहे. पण काँग्रेस मंत्री अजूनही वेटींगवर असल्याने पक्षात नारजी असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल 4 मंत्री आणि 1 विरोधी पक्ष नेत्यांच्या शासकीय निवासस्थानाचे वाटप केले. यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मंत्र्यांची नावे होती, मात्र काँग्रेसचे नवनिर्वाचित मंत्री बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनाच घराच वाटप करण्यात आलेलं नाही. शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अद्याप खात्याचं वाटप तर नाहीच पण शासकीय निवासस्थान वाटप झालं नसल्याने काँग्रेस पक्षात नाराजीचा सूर असल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप करण्यात आलं आहे. पण बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना मात्र अद्यापही शासकीय निवासस्थान दिले गेले नाही. काँग्रेस नेत्यांचं दिल्लीत लॉबिंग राज्यात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्या समर्थकांचा नंबर लागावा यासाठी राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोनिया गांधी यांच्या दरबारात आले आहेत. काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल सायंकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. बाळासाहेब थोरात आणि सोनिया गांधी यांच्यात जवळपास तीस मिनिटे झालेल्या भेटीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा दावा थोरात यांनी केला आहे. दुसरीकडे, नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हेदेखील दिल्लीत आले असून तेदेखील सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. सोबतच काँग्रेसचे दुसरे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत हे देखील दिल्लीत देण्याची शक्यता असून तेदेखील काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







