मुंबई, 22 नोव्हेंबर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे (Sharad Ranpise) यांच्या निधनानंतर रिक्त झालेली विधान परिषद जागेची निवडणूक (MLC election) आता बिनविरोध होणार आहे. कारण भाजपचे उमेदवार संजय केणेकर (Sanjay Kenekar) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता प्रज्ञा सातव यांच्या आमदारकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केणेकर यांना पक्षश्रेष्ठींनी मुंबईत बोलावलं होतं. ते आज मुंबईत दाखल झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली होती. अखेर ही माहिती खरी ठरली आहे. केणेकर आज खरंच विधान भवन परिसरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. विशेष म्हणजे प्रविण दरेकरांनी या वृत्ताला दुजोरा दिल्याने विधान परिषदेच्या या जागेची निवडणूक अखेर बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
काँग्रेसचे दिवंगत नेते शरद रणपिसे यांचं सप्टेंबर महिन्यात निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती. एखाद्या नेत्याच्या निधनानंतर त्याजागी बिनविरोध निवडीची परंपरा आहे. या रणपिसे यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेसकडून दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर दुसरीकडे याच जागेसाठी भाजपकडून संजय केणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण या जागेसाठी प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात काही दिवसांपूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी या जागेसाठीची निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. अखेर फडणवीसांनी ती विनंती मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा : भाजप-टीएमसी यांच्यात पुन्हा टोकाचा संघर्ष, घडामोडींना वेग
दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून 5 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या उमेदवारांमध्येही संजय केणेकर यांचं नाव नव्हतं. या निवडणुकीसाठी भाजपकडून कोल्हापूरमधून अमन महाडिक, धुळ्यातून अमरिश पटेल, नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे, अकोल्यातून वसंत खंडेलवाल आणि मुंबईतून राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण यामध्ये संजय केणेकर यांचा उल्लेख नाही. त्यामुळे प्रज्ञा सातव यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपचे विधानपरिषद निवडणुकीचे उमेदवार
१ कोल्हापूर- अमल महाडीक
२ धुळे नंदुरबार- अमरिष पटेल
३ नागपूर- चंद्रशेखर बावनकुळे
४ अकोला-वाशीम वसंत खंडेलवाल
५ मुंबई- राजहंस धनंजय सिंह
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.