कल्याण, 8 फेब्रुवारी : भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री हे रविवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. अमित शहा यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ची चर्चा सुरू झाली आणि राजकीय तर्क वितर्क लढवले जाऊ लागले. याच संपूर्ण घटनाक्रमावरून काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे.
'राज्यात सत्ता बदल होणार नाही, तर देशात बदल होणार आहे. राज्यातील सत्ता पाच वर्षे टिकणार असा आम्हाला विश्वास आहे,' असं वक्तव्य नाना पटोले यांनी कल्याणमध्ये बोलताना केलं आहे.
कलाकारांच्या ट्वीटवरून सरकारवर टीका
शेतकरी प्रश्नावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होऊ लागल्यानंतर भारतातील अनेक सेलेब्रिटींनी एकाच हॅशटॅगवर ट्वीट करत शेतकरी आंदोलनावर जागतिक पातळीवर चर्चा करणाऱ्यांना फटकारलं. यावरून टीका करताना नाना पटोले म्हणाले की, 'कलाकार हे एकेकाळी भाई लोकांच्या इशाऱ्यावर चालायचे. केंद्र सरकारच्या दबावाखाली त्यांनी आता ट्वीट केलं आहे. केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरु केली? हा सवाल आता मोदी सरकारला जनता विचारत आहे.'
हेही वाचा - शेतकरी आंदोलनाबाबत काँग्रेस उचलणार मोठं पाऊल, मोदी सरकारच्या अडचणी वाढणार?
दरम्यान, 'माझी लढाई जनतेची आहे. सत्तेची आणि खुर्चीची नाही. खुर्ची माझ्या मागे धावते मी खुर्चीच्या नाही. मी जनतेच्या मागे धावतो. काँग्रेसच्या माध्यमातून पूर्वीसारखं वैभव प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न करणार आहे,' असा दावा नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, Farmer protest, Nana Patole