मुंबई, 8 एप्रिल :
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करताना राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरही भाष्य केलं आहे. 'सर्वच गोष्टी भीतीदायक नाहीत. आपले रुग्ण वाढत आहेत कारण बाहेरून रुग्ण येण्याची वाट बघत नाही आहोत, तर आता आपण घरोघरी जाऊन चाचण्या करत आहोत. मुंबईतही कोरोनाच्या चाचण्या वाढवल्या आहेत. परिणामी ज्यांना कोरोना झाला आहे, ते समोर येत आहे,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना विविध सूचना दिल्या तसंच नवीन सुविधांची घोषणा केली आहे. कोरोनाच्या रुग्णांमुळे अधिक संसर्ग होऊ नये म्हणून आरोग्य सेवेची 4 भागांत विभागणी करण्यात आल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
1. सर्दी, खोकला आणि ताप असणाऱ्यांनी इतर रुग्णालयात जाऊ नये...अशांसाठी क्युअर क्लिनिकची व्यवस्था...लवकरच माहिती देण्यात येणार आहे.
2. लक्षणं दिसत नाही किंवा सौम्य लक्षणं असणाऱ्यांसाठी वेगळं रुग्णालय
3. तीव्र लक्षणं असणाऱ्यांसाठी वेगळं रुग्णालय
4. गंभीर लक्षणं असणाऱ्या आणि मधुमेह, किडण्यांचे आजार असणाऱ्यांसाठी स्वतंत्र रुग्णालय...हे रुग्णालय पूर्णपणे सुसज्ज असेल
'केंद्रांची योजना अन्नसुरक्षा लाभार्थ्यांसाठीच आहे. सर्वांची सामुहिक जबाबदारी, केंद्र आणि राज्य दोघेही काम करत आहेत. साडेपाच ते सहा लाख लोकांना सरकार रोज जेवण पुरवत आहे. केशरी रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्य देणार,' अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
संपादन- अक्षय शितोळे