मुंबई, 13 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत झालेल्या मेलोडी ड्राम्यावरून जयंत पाटील यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. अजीत पवार यांच्याआदी जयंत पाटील यांना बोलू दिल्याने अजीत पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावर अजीत पवार यांच्या नाराजीबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र जयंत पाटील यांना कोडींत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Eknath Shinde vs Jayant Patil) त्यांनी कसं काय पाटील बरं हाय का? काल दिल्लीत झालं ते खर हाय का? असे म्हणत चांगलाच चिमटा काढला आहे. दरम्यान यावरून जयंत पाटील काय म्हणतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, जुन्या चित्रपटात एक गाणं होतं, ते खूप प्रसिद्ध झालं होतं. ‘कसं काय पाटील बरं हाय का, काल दिल्लीत झालं ते खरं हाय का?’ दिल्लीत काय झालं? जयंत पाटलांनी अजित पवारांना बोलू दिलं नाही. त्यानंतर अजित पवार रागारागाने निघून गेले. कारण जयंत पाटलांना विरोधी पक्षनेता व्हायचं होतं, परंतु ते काही होता आलं नाही.
हे ही वाचा : महामार्गावर तरुणाच्या दुचाकीने घेतला पेट; दृश्य पाहून मुख्यमंत्री भरपावसात गाडीतून उतरले अन्…, VIDEO
विरोधी पक्षनेतेपदाबाबत अजित पवारांची ‘दादागिरी’ काम करून गेली. त्याचं शल्य जयंत पाटलांच्या मनात होतं. महाराष्ट्रात अजित पवारांना थांबवता येत नाही, म्हणून दिल्लीत थांबवलं. मला त्यात पडायचं नाही, ती त्यांची अंतर्गत बाब आहे, असं एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.
सरन्यायाधिशांच्या सोहळ्यावरून वाद
जयंत पाटील म्हटले त्या सोहळ्याला जायला नको होतं. अरे, आम्ही गेलो नाही, त्यांनी निमंत्रण दिलं होतं आणि आमच्यासाठी ती अभिमानाची बाब होती. कारण महाराष्ट्राचा भूमिपूत्र देशाचा सरन्यायाधीश झाला आहे. किती मोठी बाब आहे. मात्र, किती कद्रुपणा केला जात आहे. किती संकुचित वृत्ती आहे, असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर चर्चा केली होती. सत्तासंघर्षाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मुख्यमंत्र्यांनी उदय लळीत यांची भेट घेणं उचित नव्हतं असं राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. यावरून एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटलांवर टीकास्त्र सोडलं आहे.
हे ही वाचा : उदय सामंतांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यानेच केली पोलिसांत तक्रार; मंत्र्याविरोधात FIR दाखल, काय आहे प्रकरण?
कसं काय पाटील बरं आहे का काल दिल्लीत झालं ते खरं आहे का? असा जुन्या चित्रपटातील एका गाण्याचा संदर्भ घेत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीत झालेल्या घटनेचा दाखला देत जयंत पाटील यांना डिवचलं आहे. पैठणमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत हजारोंची गर्दी जमा झाली. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी जयंत पटलांवर टीकास्त्र सोडलं.