छत्रपती संभाजीनगर, 19 जुलै : शिवणकाम आणि विणकाम हे फक्त मुलींचे कामे असा आपल्याकडे एक समज आहे. हे काम फक्त मुलींनेच करावे असे पण म्हंटले जाते. पण याच गोष्टीला मोडीत काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरामधील मराठा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी ड्रेस मेकिंग हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. या कोर्स अंतर्गत शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ड्रेस मेकिंगचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. मुलांचा सहभाग मराठा हायस्कूलमध्ये इयत्ता सातवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेने अभ्यासक्रमा बरोबरच नवीन काहीतरी शिकायला मिळावे या दृष्टीने शाळेने ड्रेस मेकिंगचा कोर्स सुरू केलेला आहे. विशेष म्हणजे या कोर्समध्ये मुलांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे. फक्त मुलींनी शिवणकाम करू नये ते मुलांसाठी पण असतं हा गैरसमज दूर करण्यासाठी शाळेने हा कोर्स सुरू केलेला आहे. या कोर्स अंतर्गत विद्यार्थ्यांना मशीन कशी असते याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याच्यावरती कसे कपडे शिवतात, कपड्यांची कटिंग कशी करतात, हाताने टाके कसे देतात या सर्व गोष्टी या विद्यार्थ्यांना या कोर्स अंतर्गत शिकवल्या जात आहेत.
कार्यानुभवचा तास राखीव शाळेमध्ये कार्यानुभवचा तास हा या ड्रेस मेकिंगच्या कोर्ससाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. या कोर्स अंतर्गत विद्यार्थ्यांनी कपडे देखील शिवायला सुरुवात केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी शर्ट-पॅन्ट, बेबी फ्रॉक, बेबी पॅन्ट असे कपडे स्वतः कटिंग करून माप घेऊन शिवलेले आहेत. विशेष म्हणजे हे कपडे शिवल्यानंतर शाळेमध्ये प्रदर्शन आणि फॅशन शो सुद्धा ठेवण्यात आलेला होता. आम्हाला छान मार्गदर्शन केलं मी जेव्हा इथं पहिल्यांदा आलो होतो तेव्हा मला खूप भीती वाटली. पण नंतर हळूहळू आमच्या सर मॅडमने आम्हाला छान मार्गदर्शन केलं. आम्हाला शिकवलं की कपडे कसं शिवतात. मी आता कपडे शिवायचे शिकलो याचा मला खुप आनंद आहे, असं विद्यार्थी माऊली तांबे याने सांगितले.
इथं आल्यावर सर्व माहिती भेटली मला मशीन बद्दल काहीच माहित नव्हतं. मला इथं आल्यावर सर्व माहिती भेटली. आत्तापर्यंत मी नवनवीन कपडे देखील शिवलेले आहेत. दुसऱ्या कोणत्या शाळेमध्ये असं शिकवले जात नाही. आमच्या शाळेत शिकवतात याचा मला खूप अभिमान वाटतो, असं विद्यार्थिनी संगीता भानुकरहिने सांगितले. विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच नवीन काहीतरी शिकवण्याचा आमचा प्रयत्न होता. म्हणून आम्ही ड्रेस मेकिंगचा कोर्स हा शाळेत सुरू केलेला आहे. यातून विद्यार्थी स्वतः शिकतील आणि त्यांना रोजगार सुद्धा यातून भेटू शकतो असा आमचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे याचा मला आनंद आहे, असं मुख्याध्यापक डॉ. रुपेश मोरे यांनी सांगितले.