अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 7 मे : औरंगाबाद पश्चिमचे आमदार तथा बाळासाहेबांची शिवसेनेचे विधानसभेतील प्रतोद आमदार संजय शिरसाट यांचे चिरंजीवांचा ट्रॅक्टर चोरीली गेल्याची घटना घडली आहे. संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत यांच्या मालकीचा पाच लाख रुपयांच्या किमतीचा ट्रॅक्टर चोरट्यांनी लंपास केला आहे. सातारा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सुरू झाला आहे. काय आहे प्रकरण? संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट माजी नगरसेवक राहिले आहेत. सिध्दांत शिरसाट यांनी पाच लाख रुपयांच्या किमतीचा ट्रॅक्टर त्यांच्या व्यवसायासाठी खरेदी केला होता. सातारा परिसरातील तंत्रज्ञनगर येथे ट्रॅक्टर पार्क केला होता. येथूनच चोरट्यांनी ट्रॅक्टर लंपास केला आहे. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, आमदाराच्या मुलाचाच ट्रॅक्टर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य माणसांची काय परिस्थिती असेल, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. वाचा - बालविवाह होऊनही तक्रार देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ; तालुका प्रशासनाचं पाठबळ? काही दिवसांपूर्वी आले होते चर्चेत माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांनी केटरींगचा व्यवसाय करणाऱ्याला बिल देण्यावरुन हात-पाय तोडण्याची धमकी दिल्याची मोबाईलवरील संभाषणाची कथित ध्वनिफित प्रसारित झाली होती. यासंदर्भात सिद्धांत शिरसाट यांच्याशी व पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्याशी थेट संपर्क केला असता कुठलाही प्रतिसाद मिळू शकला नसल्याने कथित ध्वनिफितीविषयी पुष्टी मिळू शकली नाही. मात्र, याप्रकरणी सिद्धांत शिरसाट यांच्याविरोधात जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंद करावा, अशी तक्रार मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.