छत्रपती संभाजीनगर, 27 मार्च, अविनाश कानडजे : राज्य सरकारकडून औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हा प्रस्ताव केंद्राकडून मंजूर करण्यात आल्यानं औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं. मात्र आता यावरून चांगलाच वाद पेटला आहे. या नामांतराला एमआयएमने विरोध केला आहे. काही दिवसांपूर्वीच एमआयएमचे खासदार जलील यांनी या नामांतराविरोधात आंदोलन केलं होतं. तर दुसरीकडे नामांतराच्या समर्थनार्थ मनसे रस्त्यावर उतरल्याची पहायला मिळालं. दरम्यान आज नामांतरावर आक्षेप घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता औरंगाबादच्या नामांतरावर मागील महिनाभरापासून आक्षेप, हरकती व सूचना दाखल होत आहेत. आज या प्रक्रियेचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. दाखल होणाऱ्या अर्जाची संख्या लक्षात घेऊन, विभागीय आयुक्तालयात आक्षेपांसाठी एक आणि समर्थनासाठी एक अशा दोन टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. दीड लाख आक्षेप अर्ज समोर आलेल्या माहितीनुसार 24 मार्चपर्यंत तब्बल दीड लाख आक्षेप अर्ज प्राप्त झाले आहेत. तर नामांतराचं समर्थन करणारे अवघे 11 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. आज शेवटच्या दिवशी भाजपच्या वतीने मिरवणूक काढत एक लाख समर्थन पत्र विभागीय कार्यालयात दाखल करण्यात येणार आहेत, तर एमआयएमने देखील आक्षेप अर्जांची संख्या अडीच लाखांवर जाईल असा दावा केला आहे. केंद्राकडून प्रस्ताव मंजूर राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मविआनंतर सत्तेत आलेल्या शिंदे, फडणवीस सरकारने पूर्वीचा प्रस्ताव रद्द करत औरंगाबादच्या नामांतराचा नवा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला केंद्रकडून परवानगी देण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







