छत्रपती संभाजीनगर, 25 मे : बोर्डाने आज बारावीचे निकाल जाहीर केले असून यावेळी ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षराच्या प्रकरणावर स्पष्टीकरणही दिलं. साडे तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेत एकसारखे हस्ताक्षर आढळल्यानंतर बोर्डाकडून याची चौकशी केली गेली. या चौकशीत धक्कादायक अशी माहिती समोर आली. दरम्यान, मुलांनी हे हस्ताक्षर आमचे नसल्याचंही सांगितलं आहे. त्यामुळे हे विद्यार्थी दोषी नाहीत असं बोर्डाने म्हटलंय. त्यांना वेगळ्या हस्ताक्षरातील उत्तरांचे गुण मिळणार नाहीत असेही बोर्डाने स्पष्ट केले.
हस्ताक्षर घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्याचीही प्रकिया सुरू आहे. याबाबत विभागीय सचिव विजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
12th Result Declared: 'या' विभागानं पुन्हा दाखवलं आम्हीच हुशार; मायानगरी पडली मागे
बारावीच्या निकालात छत्रपती संभाजीनगरच्या बारावीच्या भौतिक शास्त्र पेपरच्या एकसारख्या हस्ताक्षर प्रकरणात बोर्डाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिलाय. 372 विद्यार्थ्यांचे निकाल बोर्डाने जाहीर केले आहेत. प्राथमिक चौकशीत विद्यार्थ्यांचा दोष नाही या निष्कर्ष पर्यंत बोर्डाची समिती आली आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना दोषी न धरता निकाल जाहीर करण्यात आलाय. तर या प्रकरणात अखेर पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय विभागीय बोर्डाने घेतला आहे.
संभाजी नगर जिल्ह्यातील दोन शिक्षकांनीच 372 पेपर मध्ये लिहण्याचा हा प्रताप केला आहे. त्यांच्या विरोधात सोयगाव तालुक्यातील फरदापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बोर्डाकडून केला जातोय. मात्र या शिक्षकांनी या 372 पेपर मध्ये का लिहिले? कारण काय? याचं उत्तर पोलिसांच्या तपासातून पुढं येईल अशी माहिती बोर्डाने दिलीय. विद्यार्थ्यांनी जितकी उत्तरे लिहिली आहेत त्याचीच शहानिशा करून हे पेपर तपासण्यात आले आहेत आणि निकाल जाहीर करण्यात आलाय असंही बोर्डाने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: HSC Result