छत्रपती संभाजीनगर, 31 मे, अविनाश कानडजे : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मटण कोण जास्त घेणार यावरून वाद झाला. या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सिल्लोड तालुक्यातील धारला येथील ही घटना आहे. जितेंद्र धृवे असं मृत व्यक्तीचं नाव आहे, तर ओमजय सूर्यवंशी असं आरोपीचं नाव आहे. डोक्यात रॉडने मारहाण करण्यात आल्यानं जितेंद्र धृवे याचा मृत्यू झाला आहे. पार्टीत राडा घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सिल्लोड तालुक्यातील धारला येथे शेतात मटणाची पार्टी सुरू होती, या दरम्यान मटन कोण जास्त घेईल यावरून दोन मित्रांमध्ये वाद झाला. त्यानंतर सूर्यवंशी याने केलेल्या हल्ल्यात जितेंद्र धृवे यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हे दोघेही मित्र असून ते मध्यप्रदेशमधील आहेत. ते मजुरी करण्यासाठी इथे आले होते. त्यांनी शेतात मटनाची पार्टी केली, याच पर्टीमध्ये राडा झाला.
Shocking News: लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरीची ओढणी घेऊन गेला अन्.., नवरदेवाचं धक्कादायक पाऊलगुन्हा दाखल मटन कोण जास्त घेईल यावरून दोघात चांगलीच बाचाबाची झाली. ते दोघेही दारूच्या नशेत असल्याने शेतमालकांनी त्यांचे भांडण सोडवले. मात्र काही वेळाने याच मुद्द्यावरून पुन्हा दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतप्त झालेल्या ओमजयने नशेत जितेंद्रवर वार करत गंभीर जखमी केले, यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.