अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च : काही दिवसांपूर्वीच बीडच्या परळीमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिच्या परीक्षेच्या दिवशीच लावण्यात आला होता. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल 183 जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच आता औरंगाबादमध्ये अशीच घटना घडली आहे. पतीच्या निधनानंतर आर्थिक परिस्थिती ढासळल्याने एका महिलेने चक्क आपल्या अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा घाट घातला होता.
काय आहे प्रकरण?
शहरातील कांचनवाडी परिसरामध्ये बालविवाह होत असल्याची माहिती दामिनी पथकाला एका फोन कॉलद्वारे माहिती झाली. दामिनी पथकाने घटनास्थळी पोहोचली असता लग्नमंडप टाकलेला होता आणि 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 21 वर्षीय मुलासोबत साखरपुडा चालू असल्याचे निदर्शनास आले. पती 5 महिन्यापूर्वी मयत झालेले असून, 3 दांपत्य आहे आणि त्यांना सांभाळणे माझ्यासाठी शक्य नाही. त्यामुळे मुलीचा विवाह करत असल्याचे मुलीच्या आईने दामिनी पथकाला सांगितले. त्यानंतर पथकाने मुलीच्या आणि मुलाच्या नातेवाईकांना समुपदेशन करून मुलीच्या आईने अठरा वर्षे झाल्याशिवाय लग्न लावून देणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यामुळे हा विवाह रोखण्यात दामिनी पथकाला यश आले आहे.
वाचा - संगमनेरमध्ये भीषण अपघात; टँकर-दुचाकीच्या धडकेत 3 ठार, 1 जखमी
बीडमध्ये दहावीच्या पेपरदिवशी बालविवाहाचा प्रयत्न
बीड जिल्ह्यात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिच्या परीक्षेच्या दिवशीच लावण्यात आला. हा धक्कादायक प्रकार बीडच्या परळी तालुक्यातील नंदागौळ गावात उघडकीस आला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात, अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांसह, मुलाच्या आई-वडिलांवर त्याचबरोबर दोघांच्याही मामावर, फोटोवाल्यावर, भटजीवर, आचारी आणि मंडपवाल्यासह तब्बल 183 जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीवरून, परळी तालुक्यातील नंदागौळ येथील एका 16 वर्षीय मुलीचा, गावालगत असणाऱ्या चोपणवाडी येथील तरुणाशी 13 मार्च दुपारी बालविवाह झाला. सदर मुलगी इयत्ता दहावीत शिकत असुन तिचा आज गणित विषयाचा पेपर सोमेश्वर विद्यालय घाटनांदुर येथे होता. मात्र, ती पेपरला गैरहजर होती. त्याचवेळेत तिचा बालविवाह झाला.
बीड येथील चाईल्ड लाईन सदस्य तत्वशिल कांबळे यांना माहिती होताच त्यांनी बालविवाह रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासकीय यंत्रणा नंदागौळला पोहचण्यापुर्वीच बालविवाह झाला. त्यानंतर तत्वशिल कांबळे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना या प्रकाराची माहिती दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.