छत्रपती संभाजीनगर, 5 जुलै : ग्रामीण भागात पूर्वी बैलांच्या साह्याने शेतीची सगळी कामे करावी लागायची. त्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे लाकडापासून बनवलेली अवजारे असायची. त्यामुळे पेरणीपूर्वी अवजाराची दुरुस्तीची कामे करण्यासाठी सुतार व्यवसाय करणाऱ्याकडे सकाळपासून शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळत होती. मात्र या आजच्या परिस्थितीमध्ये जर पाहिला गेले तर सुतार व्यवसाय हा बंद पडल्याचं दिसून येत आहे. व्यवसायावर मोठा परिणाम शेतीची आधुनिक साधने उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील लोहार, सुतारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक शेतकरी वेळ वाचवण्यासाठी पारंपरिक शेतीची लाकडी अवजारे सोडून नविन लोखंडी अवजारे घेत आहेत तसेच या व्यवसायात मोठे यांत्रिकीकरण झाल्याने सुतार, लोहार व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. सध्याच्या तांत्रिक युगांमुळे शेतकऱ्यांकडून लाकडी अवजारा ऐवजी लोखंडी अवजाराला पसंती दिली जात आहे. त्यामुळे लाकडी अवजारांची जागा आता लोखंडी रेडिमेड अवजारांनी घेतली आहे.
कामे मिळत नाही मध्ययुगीन काळात ग्रामीण भागात बलुतेदारी पद्धती अस्तित्वात होती. ही पद्धती काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहे. महाराष्ट्राच्या अनेक खेडेगावात बलुतेदार आणि आलुतेदार होते. बलुतेदार आणि आलुतेदार गावातील शेतकऱ्यांना वर्षभर सेवा पुरवून त्या मोबदल्यात शेतकऱ्याकडून धान्य घेत होते ही पद्धती पूर्णतः बंद झाली नाही. परंतु तांत्रिक युगांमुळे अनेक शेतकरी लाकडी अवजारांची जागा आता लोखंडी रेडिमेड अवजारांनी घेतली आहे. बलुतेदारांमध्ये समाविष्ट असलेल्या लोहार सुतार व्यवसाय व्यावसायिकांना आता मोठ्या प्रमाणात कामे मिळत नाही. त्यामुळे सुतार कुटुंबीयांचे जीवन हे त्यांच्या आता कौशल्यातून घडविलेल्या विविध लाकडी वस्तूंच्या मिळकतीवर अवलंबून आहे, असं कारागीर राम थोरात सांगतात.
शेतकरी फारशी गर्दी करत नाही पावसाळा जवळ आला की, पूर्वी शेतकरी हे सुतार, लोहार यांच्या दुकानावर गर्दी करत असत. शेतीसाठी वापरासाठी लागणारे वखर, पांबर, तिफन, जु, करून घेत होते. परंतु आता या लाकडी अवजारांची जागा ही लोखंडी अवजारांनी घेतली असल्याने दुकानावर पूर्वीसारखी शेतकरी फारशी गर्दी करत नाही, असंही राम थोरात यांनी सांगितले.