तुषार कोहळे, वर्धा, 10 एप्रिल: वर्ध्यातील एका खाजगी रुग्णालयाचा गलथान कारभार (private hospital) चव्हाट्यावर आला आहे. याठिकाणच्या एका रुग्णालयानं कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती परिवाराला दिली आहे. त्यामुळे दुःख सागरात लोटलेल्या कुटुंबीयांनी शोक व्यक्त करत अत्यंसंस्काराची तयारीही केली. एवढं सर्व झाल्यानंतर रुग्णालयातून फोन आला आणि संबंधित रुग्ण जीवंत असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे. आपला रुग्ण जिवंत असल्याची माहिती मिळाल्यानंतर संभ्रमात असलेल्या परिवाराने रुग्णालयात धाव घेतली.
संबंधित घटना वर्धा जिल्ह्यातील जामठा येथील आय. जी. पी. ए हॉस्पिटल रिसर्च सेंटर या रुग्णालयात घडली आहे. काशीनगर परिसरात राहणाऱ्या 63 वर्षीय आशाबाई चंद्रभान मुन यांना शुक्रवारी कोव्हिडची लागण (COVID-19 Positive) झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशीरा त्यांना जामठा येथील आय. जी. पी. ए हॉस्पिटल रिसर्च सेंटर रुग्णालयात दाखल केलं. त्यांना कोरोनाची लागण झाली असल्यानं रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णाचे नातेवाईक परत घरी परतले.
पण आज सकाळी मुन परिवाराला रुग्णालयातून फोन आला आणि आशाबाई यांचं निधन झाल्याची माहिती देण्यात आली. आशाबाईचं निधन झाल्याची माहिती मिळताचं घरच्यांनी रुग्णालयात धाव घेतली. याठिकाणी रुग्णालय प्रशासनाकडून नातेवाईकांना मृतदेह आणि मृत्यूचा दाखलाही देण्यात आला. दरम्यान कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. तसेच घरी मंडपही टाकला. जवळच्या पाहुण्यांनाही अंत्यविधीसाठी बोलावण्यात आलं. रुग्णाच्या घरात मृत्यूचा शोक व्यक्त होतं असताना, रुग्णालयातून एक फोन आला.
हे ही वाचा-नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शनची विक्री
यावेळी आशाबाई यांचं निधन न झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये एकच गोंधळ उडाला. खाजगी रुग्णालयाचा या हलगर्जीपणामुळे संबंधित नातेवाईक संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी तातडीनं रुग्णालय गाठून आशाबाई याना दुसऱ्या रुग्णालयात हलवलं आहे. याबाबतचा जाब रुग्णालय प्रशासनाला विचारला असता, त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली आहे. तसेच संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्नही केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Wardha news