मुंबई, 4 जून : राज्यात विशेषत: राजधानी मुंबईत (Mumbai) गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Corona Cases) रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. गुढीपाडव्याच्या आधी राज्य सरकारने कोरोनासंबंधित सर्व निर्बंध हटवले होते. मास्क लावणंही ऐच्छिक केलं होतं. पण सततच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. सध्यातरी मास्क सक्ती करण्यात आलेली नाहीय. पण पुढचे 10 -15 दिवस रुग्णवाढ होत असलेल्या ठिकाणी आणि बंदिस्त ठिकाणी मास्क (Mask) वापरा, असं सांगण्यात आलंय. ज्यामध्ये बसेस, लोकल ट्रेन, ऑफिस, शाळा, सिनेमागृह, सभागृह, मॉल्स अशा ठिकाणांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यांपासून देशातील कोरोना रुग्णसंख्येची वाढ कमी झाली होती. मात्र आता गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. 84 दिवसांनंतर शुक्रवारी पहिल्यांदाच देशातील नवीन कोविड रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पुढे गेली. तर, 4 फेब्रुवारीनंतर मुंबईत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सर्वांत मोठी वाढ दिसून आली. शनिवारी देशात 3962 नवीन रुग्ण आणि 26 मृत्यूची नोंद झाली आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेटदेखील वाढत आहे. त्यामुळे देश कोरोनाच्या चौथ्या लाटेकडे वाटचाल करत आहे का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. केंद्र सरकारचं पाच राज्यांना पत्र कोरोना प्रकरणांमध्ये झालेली वाढ पाहता, केंद्र सरकारने 5 राज्यांना पत्र लिहून रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी खबरदारी घेण्यास आणि कडक उपाययोजना राबविण्यास सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांना या संदर्भात पत्र लिहिलंय. या पत्रात म्हटलं आहे की, राज्यांमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे स्थानिक संसर्ग वाढण्याची शक्यता वाढते. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. पण 27 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 15,708 नवीन प्रकरणं नोंदवली गेली असून, 3 जून रोजी आठवड्यातील रुग्णसंख्या 21,055 झाली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट 0.52 टक्के होता तो जूनच्या पहिल्या आठवड्यात 0.73 टक्के झाला आहे. ( देवेंद्र फडणवीसांना ताप, सोलापूर दौरा रद्द, मुंबईच्या दिशेला रवाना ) महाराष्ट्रातील परिस्थिती महाराष्ट्रात, 27 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 2,471 नवीन रुग्ण आढळले, तर 3 जूनच्या आठवड्यात त्यांची संख्या 4,883 झाली. पॉझिटिव्हिटी रेट देखील 1.5 वरून 3.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये, मुंबई उपनगरांसह (मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर) कोरोनाचा प्रसार सर्वाधिक होत आहे. वाढत्या केसेस पाहता मुंबई महानगरपालिकेने (BMC) कोविड टेस्टिंग (Covid Testing) वाढवण्याच्या आणि वॉर्ड तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, आयआयटी कानपूरच्या तज्ज्ञांसोबत बीएमसी प्रमुखांची बैठक झाली होती, त्या बैठकीत जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती वर्तवण्यात आली होती. संसर्ग वाढणाऱ्या इतर चार राज्यांची परिस्थिती केंद्राने पत्र लिहिलेल्या 5 राज्यांपैकी महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर चार राज्यांबद्दल बोलायचं झाल्यास, 27 मे च्या आठवड्यात तमिळनाडूमध्ये 335 प्रकरणं नोंदवली गेली, तर 3 जून रोजी संपलेल्या आठवड्यात ती 659 वर पोहोचली. तसंच पॉझिटिव्हिटी रेटदेखील 0.4 वरून 0.8 पर्यंत वाढला आहे. 27 मेच्या आठवड्यात केरळमध्ये 4,139 प्रकरणं आढळून आली. तर, 3 जूनच्या आठवड्यात 6,556 प्रकरणं नोंदवली गेली, जी देशातील एकूण प्रकरणांपैकी 31.14 टक्के होती. तसंच विकली पॉझिटिव्हिटी रेटदेखील 5.2 वरून 7.8 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तेलंगणाबद्दल बोलायचं झाल्यास, आरोग्य सचिवांच्या पत्रानुसार, 27 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 287 नवीन रुग्ण आढळले, तर 3 जून रोजी संपलेल्या आठवड्यात 375 नवीन रुग्ण आढळले. पॉझिटिव्हिटी रेट 0.4 टक्क्यांवरून 0.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. कर्नाटकची स्थिती पाहिल्यास, 27 मेच्या आठवड्यात 1003 रुग्ण आढळले आणि 3 जून रोजी संपलेल्या आठवड्यात 1446 नवीन रुग्ण आढळले. पॉझिटिव्हिटी रेट 0.8 वरून 1.1 टक्क्यांपर्यंत वाढला असून राजधानी बंगळुरूत सर्वाधिक प्रकरणं आढळली आहेत. एक्सपर्ट्स काय म्हणतात? केवळ भारतातच नाही तर जगभरातील कोरोना रुग्णांच्या वाढीसाठी ओमिक्रॉन व्हेरियंट (Omicron Variant) जबाबदार असल्याचं म्हटलं जातंय. देशात Omicron चा सब व्हेरियंट BA.4 आणि BA.5 आढळल्यानंतर सरकार आणि एजन्सींनी त्याची दखल घेतली. दरम्यान, भारतातील बहुतांश लोकसंख्येचं लसीकरण झाल्याने घाबरून जाण्याची गरज नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. प्रसिद्ध व्हायरॉलॉजिस्ट डॉ. शाहीद जमील यांनी या संदर्भात इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘आपल्याला नक्कीच सावध राहावं लागेल. जर एखादी व्यक्ती विषाणूच्या संपर्कात आली तर तिला संसर्ग होऊ शकतो. परंतु, स्थिती गंभीर होण्याची शक्यता कमी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे देशातील बहुतांश लोकांना कोरोनाची लागण होऊन गेलीये किंवा त्यांचं लसीकरण (Vaccination) झालंय. त्यामुळे त्यांच्यामध्ये इम्युनिटी (Immunity) तयार झाली आहे.’ ‘शरीरातील अँटीबॉडीजची पातळी कालांतराने कमी होत असली तरी टी सेल्स व्हायरसपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत राहतील आणि मानवी शरीराराला सुरक्षा देत राहतील, त्यामुळे जास्त काळजी करण्याचं कारण नाही,’ असे ICMRचे तज्ज्ञ डॉ. संजय पुजारी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.