सोलापूर, 4 जून : भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा सोलापूर (Solapur) दौरा रद्द करण्यात आला आहे. फडणवीस यांना ताप असल्याने ते सोलापूर दौरा रद्द करुन मुंबईच्या दिशेला रवाना झाले, अशी माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा हा नियोजित होता. या दौऱ्यादरम्यान लोकार्पण कार्यक्रम होते. तसेच काही महत्त्वाच्या भेटीगाठी होणार होत्या. पण प्रकृतीच्या कारणास्तव फडणवीसांना सोलापूर दौरा रद्द करुन मुंबईला परतावं लागलेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे लातूर दौऱ्यावर होते. लातूरचा दौरा आटोपून ते सोलापूरच्या दिशेला रवाना होणार होते. पण त्यांना ताप आल्याने त्यांचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांना कालपासूनच प्रकृतीचा त्रास सतावत होता. त्यांना काल महाविकास आघाडीच्या शिष्ठमंडळाने भेट दिली होती. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रस्ताव दिला होता. या भेटीदरम्यानदेखील फडणवीस यांना काहीसा ताप आलेला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीनंतर फडणवीस काल मुंबईतील कार्यक्रम आटोपून रात्री लातूरच्या दिशेला निघाले. लातूरमध्ये आल्यावर आज सकाळीदेखील त्यांना ताप होता. त्यांनी औषधं घेतली होती. पण तरीही त्यांचा ताप कमी झालेला नव्हता. फडणवीस लातूरच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांनी मंचावरुन भाषणही केलं. या कार्यक्रमादरम्यानच आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी फडणवीस यांना 102 इतका ताप असल्याची माहिती कार्यकर्त्यांना दिली होती. ( मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद सभेला अखेर परवानगी, सभेसाठी पोलिसांच्या 16 अटी-शर्थी ) लातूरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर देवेंद्र फडणवीस सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार होते. सोलापूरमध्ये दैनिक पुण्य नगरीचा त्यांचा नियोजित कार्यक्रम होता. पण तब्येत बरी नसल्याने त्यांनी त्या कार्यक्रमाला न जाता मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला. भाजप नेते अभिमन्यू पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. “देवेंद्र फडणवीस यांना सकाळीच ताप होता. त्यांनी सकाळी औषध घेतलं होतं. पण ते या कार्यक्रमापर्यंतच थांबले. नंतर त्यांना पुढे जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी सोलापूर दौरा रद्द केला. ते हैदराबादला गेले. तिथून ते मुंबईला रवाना झाले आहेत. तरीही लोकांनी घाबरु नये. काहीही झालेलं नाही. त्यांच्या शरीराचं फक्त तापमान वाढलेलं आहे. त्यामुळे त्यांनी सर्व दौरे रद्द करुन मुंबईला जायचा निर्णय घेतलेला आहे”, अशी माहिती अभिमन्यू पवार यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.