ठाणे, 29 मे: राज्यात लसींच्या तुटवड्यामुळे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सध्या बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सध्या केवळ 45 वर्षांहून अधिक वयाच्या आणि फ्रंटलाईन वर्कर्सला लसीकरण (Vaccination) करण्यात येत आहे. मात्र, असे असताना दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटरमध्ये (TMC Parking Plaza Covid Center) सुपरवाझर असल्याचे सांगत चक्क एका महिला सेलेब्रिटीने (Woman celebrity) लसीकरण करुन घेतल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या महिला सेलिब्रेटीला फ्रंटलाईन वर्करचे ओळखपत्र कोणत्या संस्थेने दिले आणि कशासाठी दिले हे देखील तपासावे लागणार आहे. त्यामुळे आता ओळखपत्र देणारी संस्था देखील अडचणीत आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाणे महानगरपालिकेतील भाजप गट नेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. तर पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी या बाबत संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल असे तोंडी सांगितले आहे.
मीरा चोपडा (Meera Chopda) असे नाव असलेल्या ओळख पत्र आणि संबंधीत सेलिब्रेटीने लस घेतल्यानंतर स्वतःच इंन्स्टाग्राम आणि ट्विटरवर लस घेतल्याची पोस्ट टाकली. या सर्व प्रकरणा नंतर आता भाजपने पालिका प्रशासनावर आक्षेप घेतला आहे. सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर सेलिब्रेटी मीरा चोपडा हिने हे फोटो सोशल मीडियावरुन काढल्याचेही दिसून आले आहे.
गेल्या 24 तासांत राज्यातील रुग्णसंख्येत मोठी घट; मृत्यूचा आकडा मात्र चिंताजनक राज्य शासनाकडून 18 ते 44 वयोगटातील तरुणांचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. तसेच ठाण्यातील सर्वसामान्यांना देखील लस घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. परंतु असे असतांना सेलेब्रिटींना पार्किंग प्लाझा येथे लस कशी मिळवली? ते वयात बसतात का? त्यांच्यासाठी लस कशी उपलब्ध करुन दिली जाते? या प्रकरणाची चौकशी करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असे ठाणे महानगरपालिका भाजप गट नेते मनोहर डुंबरे यांनी सांगितले आहे.
ठाणे महापालिकेने कोविड हॉस्पिटलमध्ये कर्मचारी पुरविण्याचे कंत्राट दिलेल्या ओम साई आरोग्यकेअर कंपनीने चक्क तमिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटातील अभिनेत्री मिरा चोप्राला कामावर ठेवलंय. मिराला सुपरवायझर म्हणून काम करण्याचे कंत्राटदार किती पैसे देतोय? कि लस घेण्यापूरते आयकार्ड दिले गेले? pic.twitter.com/xgTMzBmXBF
— Niranjan Davkhare (@niranjandtweets) May 29, 2021
तर या प्रकरणाचा तपास करू आणि कोणी अशा प्रकारे लस दिली, संबंधीत सेलेब्रिटीचे वय किती आहे. तसेच संबंधीत संस्थेकडून तिला ओळखपत्र कसे देण्यात आले, याची माहिती घेतली जाईल. तसेच योग्य ती चौकशी करुन पुढील कारवाई केली जाईल असे पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी तोंडी सांगितले आहे. ओम साई आरोग्य केयर सेंटर या खाजगी कंपनीने सेलिब्रेटी मीरा चोपडा हिला सुपरवायझर भासवून लस देण्यात आल्याची बाब समोर आलेली आहे. त्याच बरोबर सोशल मीडियावर लस घेतल्याचे फोटो देखील काढल्याचेही दिसून आले आहे. एकीकडे बाहेर गावी जाणाऱ्या 18 ते 44 तरुण मंडळींना लसीकरण करता येत नाही त्यामुळे ते बाहेर गावी कामानिमित्त जाऊ शकत नाही आणि अशा वेळेस सेलिब्रेटी असलेल्या मीरा चोपडा नावाच्या व्यक्तीला लस दिली जाते ही गंभीर बाब आहे. त्यामुळे राज्य सरकार असो या पालिका प्रशासन हे सेलिब्रेटी साठी लसीकरण देऊ शकते मात्र इतर जणांना लस देऊ शकत नसल्याचे गंभीर आरोप भाजप गट नेते मनोहर डुंबरे यांनी केले आहे. तर या प्रकरणी संबंधित कंपनी आणि इतर जणांवर पालिका प्रशासनने कारवाई करण्याची मागणी भाजप गट नेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे.