अकोला, 11 एप्रिल : एसटी कर्मचाऱ्यांची (ST Workers) कोर्टात भूमिका मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. विशेष म्हणजे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. सदावर्ते यांना आज मुंबईत गिरगाव कोर्टात (Girgaon Court) हजर करण्यात आलं होतं. यावेळी झालेल्या युक्तीवादानंतर त्यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी (police custody) वाढवण्यात आली. विशेष म्हणजे सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलीसही (Satara Police) कोर्टात हजर झाले होते. साताऱ्यात सदावर्तेंच्या विरोधात दाखल झालेला गुन्ह्याचं प्रकरण वेगळं आहे. सदावर्तेंना कोर्टाने दोन दिवस कोठडी सुनावली असल्याने सातारा पोलिसांचा अर्ज पेंडिंगवर ठेवण्यात आला आहे. हेही असे की थोडके आता अकोल्यातून माहिती समोर आली आहे. अकोल्यात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील व अन्य 2 जणांविरुद्ध अकोट शहर पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार सेना कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी अकोला शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
या प्रकरणावर अकोट पोलीस ठाण्याचे अकोट शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरोक्षक प्रकाश अहिरे यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. "राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. या संपामध्ये सहभागी झाल्यानंतर एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांवर बडतर्फ आणि निलंबन, अशा अनेक कारवाया केल्या होत्या. या कारवायांपासून वाचण्यासाठी औरंगाबाद डेपोचे अजयकुमार गुजर, अकोट आगारातील प्रफुल्ल गावंडे यांच्यामार्फत गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील यांनी 74 हजार 400 रुपये अकोट शहरातील कर्मचाऱ्यांचे स्वीकारले होते. तसेच राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांकडून 3 कोटी रुपये भूलथापा देऊन, कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ देणार नाही, असे खोटे आश्वासन देवून या चौघांनी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यांच्याविरोधात आज अकोट शहर पोलीस ठाण्यामध्ये कलम 420 आणि 434 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कुणालाही अटक झालेली नाही", अशी माहिती पोलीस निरोक्षक प्रकाश अहिरे यांनी दिली.
(राज्यावर मोठं वीज संकट कोसळण्याची शक्यता, फक्त दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवावस्थानी दोन दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं होतं. याच आंदोलन प्रकरणी सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. सदावर्ते यांनी चिथावणीखोर भाषणे केल्याचा आणि षडयंत्र रचण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 530 रुपये घेतले, असा दावा सरकारी वकिलांनी आज कोर्टात केला. हा दावा सदावर्ते यांची बाजू मांडणारे गिरीश कुलकर्णी यांनीदेखील मान्य करत ते पैसे कर्मचाऱ्यांसाठीच गोळा केल्याचं स्पष्ट केलं. पण याच मुद्द्यावरुन महाराष्ट्र एसटी कामगार सेना कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी अकोला शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अजयकुमार गुजर यांच्यामार्फत फसवणूक केली गेल्याचा आरोप मालोकार यांनी केला आहे.
कोर्टात आज काय-काय घडलं?
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांची (ST Employees Protest) बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. कारण गिरगाव कोर्टाने (Girgaon Court) सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. त्यामुळे सदावर्ते यांची पुन्हा कोठडीत रवानगी होणार आहे. सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत राहावं लागेल. त्यानंतर कोर्टात हजर केलं जाईल. त्यानंतर पुन्हा पोलीस कोठडीची आवश्यकता असल्यास पोलीस त्याबाबतची मागणी करतील. विशेष म्हणजे पोलिसांनी सदावर्ते यांची 11 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सरकारी वकील नेमकं काय म्हणाले?
शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्याआधी एक बैठक झाली होती. या बैठकीत सिल्व्हर ओक येथे हल्ला करण्याचे ठरले होते. अभिषेक पाटील नावाचा एक एसटी कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने फोन करुन काही पत्रकारांना बोलावले. त्यावेळी युट्युब चॅनलचे देखील पत्रकार होते. याप्रकरणी आणखी चार जणांचा ताबा पाहिजे. तसेच एक जण फरार आहे.
(तुमच्या परवानगीशिवाय आता 'हे' होणारच नाही, व्हॉट्सअॅपचं नवं अपडेट)
MJT मराठी न्युज चॅनलचा चंद्रकांत सुर्यवंशी नावाचा पत्रकार सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने काही व्हिडिओ डिलीट केले आहेत. या पत्रकाराचे आणि सदावर्ते यांचे सकाळी साडेदहा वाजेपासून व्हाट्सअॅप चॅट आहेत. या दोघांमध्ये व्हाट्सअॅप कॉल झाले. तर एक फोन नागपूर येथे करण्यात आला. तो फोन नेमका कुणाला करण्यात आला त्याचं नाव आता आम्ही कोर्टात सांगू शकत नाही.
काहीजण यामागे आहेत जे वेस्टेड कारणाकरता सपोर्ट करतायेत. त्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पैसे कुठून येतायेत याचा तपास करायचा आहे. 530 रुपये प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याकडून गोळा केले गेले. जवळपास 1 कोटी 80 लाख रुपये इतकी मोठी ती रक्कम आहे. या पैशांचे इतरही काही लाभार्थी आहेत. हे तपासात समोर आले आहे.
सदावर्ते यांचा एक फोन सापडत नाहीय. त्यात अनेक महत्वाच्या गोष्टी दडल्या आहेत. तो मोबाईल 31 मार्च 2022 पासून मिसिंग आहे. तो मोबाईल आणि सिम कार्ड जप्त करायचे आहे. सदावर्ते हे नागपूर मध्ये कोणच्या तरी सतत संपर्कात होते. घटनेच्या दिवशी सकाळी 11.35 मिनिटांनी फोन केला गेला होता. दुपारी 1.38 वाजता नागपूरच्या नंबरवर मॅसेज करुन सांगितले गेले की पत्रकार पाठवा. 12 एप्रिलला बारामतीत जायचे हा फक्त एक भ्रम तयार केला गेला होता. दुपारी 2.45 वाजता इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पत्रकारांना कळवलं गेलं. सदावर्ते मुद्दाम या घटनेच्या वेळेस कोर्टात गेले होते.
या प्रकरणी 4 नव्या जणांना अटक करण्यात आली आहे. तर एकजण फरार आहे. ताजुद्दीन शेख याने मॅसेज केले होते. 'सावधान शरद' नावाचा बॅनर बनवले गेले होते. या बॅनरवर सदावर्ते पती पत्नीचा फोटो आहेत. आमदारांना 1 लाख पेन्शन आणि कामगारांना 1600 पेन्शन हा मॅसेज फिरवला गेला.
अभिषेक पाटील याने शरद पवारांच्या बंगल्याची रेकी केली. याप्रकरणी पोलिसांनी अभिषेक पाटील, कृष्णा कोरे, मोहम्मद ताजुद्दीन, मंदाकिनी पवार या आरोपींना अटक केली. सच्चिदानंद पुरी यांचे देखील नाव तपासात समोर आले आहे. सदावर्तेंचा मोबाईल फोन शोधायचा आहे आणि १ कोटी ८० लाख रुपये कोणी कसे गोळा केले, ते पैसे कोणी कोणी वापरले याचा तपास करायचा आहे. या तपासासाठी कोर्टाने 11 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
सदावर्तेंचे यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांचा युक्तीवाद
सदावर्ते यांच्यावर केलेले आरोप साफ चुकीचे आहेत. ज्या फोन आणि सीमकार्डबाबत पोलीस बोलत आहेत त्या सीमकार्डची वॅलिडिटी 31 मार्चपर्यंत होती. म्हणून त्या दिवसापर्यंतच फोन वापरला आणि त्यानंतर तो फोन देखील वापरण्यात आला नाही. प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याकडून 530 रुपये गोळा केले हे खरं आहे. पण ते त्यांच्या कामाकरताच गोळा केले गेले. तशी पावती सर्वांना दिली गेली आहे.
तुम्ही पत्रकारांना बोलावले गेले याबाबत बोलत आहात मग पोलिसांना जर आधीच माहिती होती तर पोलिसांनी सुरुवातीलाच बंदोबस्त का लावला नाही? एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले, काय नुकसान झाले? त्यादिवशी कोणताच गुन्हा घडला नाही. कामगारांनी आपले आंदोलन केले. धक्काबुक्की झाली. सिल्व्हर ओकवर आंदोलन केले आणि चप्पल फेकली म्हणून फक्त गुन्हा दाखल करण्यात आलाय. MJTच्या चंद्रकांत सुर्यवंशी याच्याशी फोनवर बोलणे झाले ते मोर्चा बद्दल बोलणे झाले. तसेच अनेक पत्रकारांनीदेखील फोन केला होता. आंदोलक गेले आणि त्यांनी गेटवर चप्पल फेकल्या आहेत. या आंदोलनात कोणीही जख्मी झाले नाही.
नागपूरमधील एका व्यक्तीशी बोलणे झाले आहे. पण कोणाशी बोलणे झाले आहे हे शोधू शकले नाहीत, असं कधी होतं का? असा प्रश्न गिरीश कुलकर्णी यांनी उपस्थित केला. त्यावर लगेच सरकारी वकील प्रदीप घरत यांनी उत्तर दिलं. नागपूरमध्ये कोणाशी बोलणं झालंय याची माहिती आम्ही दिलीय. फक्त नाव घेता येत नाही असं कोर्टाला सांगितलं आहे, असं घरत यांनी सांगितल.
नागपुरचा फोन हा केवळ हवेतला आरोप आहे. पैसे गोळा केला गेला याबाबतदेखील माहिती पूर्ण नाहीय. पोलीस कधी दीड कोटी तर कधी 1 कोटी 80 लाख घेतल्याचं बोलत आहेत.
स्पॉटवर कोणालाही इजा झाली नाही. आंदोलकांनी कोणालाही इजा केली नाही. सोबतच फक्त चप्पलफेक केली. ज्याला इजा करायची असं ते म्हणतायत त्याला इजा देखील केली नाही. मग हे म्हणणे कसं बरोबर आहे की हे षडयंत्र आहे. ही कॉन्पीरसी होऊ शकत नाही.
कोणी पैसे दिले त्यांची काही तक्रारच नाही. त्यामुळे मी त्या मुद्द्यात जात नाही. याप्रकरणी कलम 353 लावण्यात आला आहे. पोलीस कस्टडीची गरज नाहीय. कोणी कोणाला मारलं काहीच माहिती नाहीय. हे खरं नाही का की रिटायर्ड राजकारणी लाख रुपये कमवतो आणि सामान्य माणसाला कमी पैसे मिळतायत. हेच तर माझे क्लायंट बोलत आहेत. शरद पवारांकडे गेलो कारण त्यांनी हे सरकार बनवलंय, असं सदावर्तेंच्या वकिलांनी सांगितलं. या दरम्यान चार कर्मचाऱ्यांची पोलीस कोठडी मागितली. मात्र कर्मचारी कोर्टात हजर न केल्याने त्याबाबत निर्णय घेणार नसल्याचे कोर्टने स्पष्ट केले.
युक्तीवादच्या शेवटच्या टप्प्यात प्रदीप घरत यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. संबंधित घटनेत दोन पोलीस जख्मी झाले आहेत. त्यापैकी एकावर अजूनही उपचार सुरु आहेत, असं सरकारी वकिलांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.