रायगड, 23 मार्च : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी (Bullock cart race in Maharashtra) दिली आहे. त्यानंतर राज्यभरात बैलगाडा शर्यतींचे आयोजन सुरू झाले आहे. मात्र, याच बैलगाडा शर्यतीत अनेकदा अपघात (Accident during bullock cart race) झाल्याच्या घटना समोर येत आहेत. गेल्या महिन्यात रायगड (Raigad) जिल्ह्यातही बैलगाडा शर्यती दरम्यान झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव उमेश वर्तक असून ते अलिबाग पंचायत समिती सदस्य होते. शर्यत जिंकली पण… बैलगाडी स्पर्धेत आपली गाडी पहिल्या नंबरवर असल्याचा आनंद अनुभवत असताना मागून आलेल्या दुसऱ्या बैलगाडीने धडक दिल्याने उमेश वर्तक हे गंभीर जखमी झाले होते. उमेश वर्तक याची महिनाभर चाललेली मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. मंगळवारी सायंकाळी उमेश वर्तक (53 वर्षे) यांची प्राणज्योत मालवली. उमेश वर्तक हे अलिबाग पंचायत समितीचे विद्यमान सदस्य होते. त्यांच्या मृत्यूमुळे वरसोली परिसरात दु:खाचे सावट पसरले आहे. उमेश वर्तक हे वरसोली येथील रहिवासी आणि बैलगाडीप्रेमी म्हणून परिचित होते. वाचा : बैलजोडी थेट प्रेक्षकांच्या अंगावर, LIVE VIDEO राजकारणाशी कुठलाही संबंध नसलेल्या उमेश वर्तक यांना अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग पंचायत समिती निवडणुकीत उभे केले आणि जिंकूनही आणले. उमेश वर्तक यांनी महिनाभरापूर्वी आपली बैलगाडी एका स्पर्धेत उतरवली होती. स्पर्धेत उमेश यांची गाडी सर्वांत पुढे होती. आपल्या बैलांची करामत उमेश भारावून पाहत होते. इतक्यात मागून आलेल्या एका बैलगाडीचा धक्का उमेश यांना लागला होता. उमेश यांची बैलगाडी स्पर्धेत जिंकली होती. मात्र अपघातात जखमी झालेले उमेश वर्तक यांचा मृत्यूने पराभव केला. मुंबई येथील एका रुग्णालयात महिनाभर त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. अखेर मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. फेब्रुवारी महिन्यातही अपघात रायगडमध्ये सुद्धा बुधवारी (2 फेब्रुवारी 2022) एका बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या बैलगाडा शर्यतीत मोठी दुर्घटना घडली होती. बैलजोडी थेट प्रेक्षकांवर आल्याने तिघेजण जखमी झाले आहेत. या घटनेचा अंगावर काटा आणणारा लाईव्ह व्हिडीओ सुद्धा समोर आला होता. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त सदर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडी शर्यत सुरू होताच अचानक एक बैलगाडी प्रेक्षकांच्या अंगावर आली. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.