राहुल खंदारे, प्रतिनिधी
बुलडाणा, 29 सप्टेंबर : मोबाइलमध्ये गेम (Mobile Game) खेळू नको म्हणून हटकल्याने एका 16 वर्षीय मुलाने आत्महत्या (16 year old suicide) केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव (Khamgaon Buldhana) येथे घडली आहे. दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शाळा, महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक सत्र हे ऑनलाइन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल घेऊन दिले. मात्र या शिक्षणासोबतच मुलं ऑनलाइन गेमच्या सुद्धा आहारी जात असल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Parents stopped to play mobile games, student killed self)
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. त्याला पालकांनी मोबाइलमध्ये गेम खेळू नको म्हणून हटकले होते. त्यानंतर तो रागाच्या भरात घरातून निघून गेला आणि घराशेजारी असलेल्या विहिरीत त्याने उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाच्या नादात मुलं मोबाइल गेमच्या आहारी जात असल्याचंही दिसून येत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेम खेळण्यासाठी फोन दिला नाही म्हणून आत्महत्या
मोबाइल न दिल्याने काही दिवसांपूर्वी बुलडाण्यातील एका 12 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. अभ्यासाबरोबरच या लहान मुलांकडून गेम खेळणे, व्हिडीओ पाहणे यांकरता देखील मोबाइलचा वापर वाढला आहे. मुलं मोबाइलच्या आहारी गेल्याचंही अनेकदा पाहायला मिळतं आहे. अशावेळी मोबाइल मिळाला नाही तर मुलं आरडाओरड करतात, रडतात किंवा रुसून बसतात. पण बुलडाणामधील या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. अवघ्या 12 वर्षांच्या मुलाने त्याला गेम खेळण्यासाठी मोबाइल मिळाला नाही म्हणून टोकाचं पाऊल उचललं आहे. विषारी औषध घेऊन या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे बुलडाण्यातील इंगळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या टाकळीपंच येथील शेतकरी दाम्पत्याने कोरोना काळात आपली मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्यांना अँड्रॉइड मोबाइल घेऊन दिला. दिवसभर शेतीची काम करून हा मोबाइल त्यांनी मुलांना शिक्षणासाठी घेऊन दिला होता. मात्र हाच मोबाइल त्यांच्या मुलासाठी काळ बनून येईल हे त्यांना उमगलं नाही.
शेतीच्या कामात व्यस्त असल्यामुळे दिलेल्या मोबाइलवर मुलं दिवसभर काय करतात याकडे त्यांचं लक्ष गेलं नाही. घरात दोघे भावंड अभ्यास सोडून मोबाइलवर ऑनलाइन गेम्स खेळत होते. एके दिवशी या भावंडांपैकी शैलेश या 12 वर्षीय मुलाला त्याच्या भावाने मोबाइल न दिल्याने त्याने रागाच्या भरात विष पिऊन आत्महत्या केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Buldhana news, Crime, Mobile