Home /News /maharashtra /

त्रास देते म्हणून मुलानेच दिली सावत्र आईची सुपारी, मारेकऱ्यांनी घरात घुसून केला गोळीबार!

त्रास देते म्हणून मुलानेच दिली सावत्र आईची सुपारी, मारेकऱ्यांनी घरात घुसून केला गोळीबार!

शहरातील संविधाननगरमध्ये 16 जानेवारी रोजी अज्ञात इसमाने घरात घुसून गोळीबार केला होता. त्यात ज्योती डोंगरे ही महिला जागीच ठार झाली होती

मनमाड, 25 जानेवारी :  दहा दिवसांपूर्वी मालेगावच्या भायगाव शिवारातील संविधान नगरमध्ये घडलेल्या हत्याकांडाला नवीन वळण मिळालं आहे.  सावत्र मुलानेच भाडोत्री गुंडाला सुपारी देऊन आईची हत्या घडवून आणल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी सावत्र मुलगा मनोज डोंगरे याच्यासह 5 जणांना अटक करून त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शहरातील संविधाननगरमध्ये 16 जानेवारी रोजी अज्ञात इसमाने घरात घुसून गोळीबार केला होता. त्यात ज्योती डोंगरे ही महिला जागीच ठार झाली होती. गोळीबार केल्यानंतर मारेकरी पळून गेले होते. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे मालेगाव शहर हादरले होते. शहरात पंधरा दिवसात गोळीबार झाल्याची ही दुसरी घटना होती. त्यामुळे पोलिसांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात होते. घटना घडल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपाधीक्षक शशिकांत शिंदे यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत सापळा रचला. मयत ज्योती डोंगरेची हत्या तिच्या सावत्र मुलानेच घडवून आणल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी  मनोज डोंगरे याला ताब्यात घेऊन विचारपुस केली असता  सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे  दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखविताच आपणच सावत्र आईची हत्त्या घडवून आणल्याची कबुली त्याने दिली. आई सावत्र असल्याने ती नेहमीच त्रास देत होती, म्हणून तिच्या हत्या घडवून आणली, असंही त्याने पोलिसांना सांगितलं. एका मित्राच्या साहाय्याने भाडोत्री गुंडाला सुपारी दिल्याचेही त्याने सांगितल्या पोलिसांनी इतर आरोपींच्या देखील मुसक्या आवळल्या. गुंतागुंतीची असलेल्या या घटनेचा अवघ्या दहा दिवसांत पोलिसांनी तपास लावून सर्व आरोपींना गजाआड केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Crime, Nashik

पुढील बातम्या