मुंबई, 22 नोव्हेंबर : मागच्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नावरून वाद सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी कित्येक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या दरम्यान पुन्हा सीमाप्रश्नावर दोन्ही राज्याकडून समन्वय साधत मार्ग काढण्याचा निर्णय काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दोन्ही राज्यांकडून आपआपल्या स्तरावर बैठका सुरु आहेत. परंतु कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई मात्र आक्रमक झाल्याने दिसून येत आहेत. सीमा प्रश्नावर जे वकील लढाई करत आहेत त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा करणार आहेत. दरम्यान दोन्ही राज्यात भाजपची सत्ता असूनही कोणताही समन्वय नसल्याच दिसून येत आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे महाराष्ट्रासोबतच्या सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज (दि.22) मंगळवारी संध्याकाळी मुकुल रोहतगी, श्याम दिवाण, कर्नाटकचे उदय होला, मारुती जिरले आणि रघुपती यांच्यासह वरिष्ठ वकिलांच्या टीमसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेणार आहेत. महाराष्ट्र सरकारने सीमप्रश्नी बैठक घेतल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रात राजकीय पक्ष सीमावादाचे राजकारण करत असल्याचा मुख्यमंत्री बोमाई यांनी थेट आरोप केला आहे.
हे ही वाचा : शिवसेना कुणाची? दिल्लीत ठाकरे गटाकडून हालचालींना वेग, आजच ‘गेम’ होणार!
यावर बोम्मई म्हणाले की, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जत तालुका कर्नाटकात सामील होण्याचा ठराव मंजूर केला आहे. 40 ग्रामपंचायतींचा समावेश असलेल्या या तालुक्याने महाराष्ट्र सरकार त्यांना पाणी देण्यास असमर्थ असल्याचा ठराव संमत केला. जत तालुक्यातील 40 गावांना अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याने कर्नाटकात सामील व्हायचे आहे, असे बोम्मई म्हणाले.
दरम्यान महाराष्ट्रात ज्या ठिकाणी कन्नड शाळा आहेत त्या शाळांचा विकास कर्नाटक सीमा विकास प्राधिकरणामार्फत निधी देऊन केला जाणार आहे. सीमा भागातील प्रश्नाबाबत मी मंगळवारी वकिलांच्या टीमसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेणार आहे. यासंदर्भात सरकारने कोणती पावले उचलली आहेत, याबाबत दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांना पत्रे पाठवण्यात येणार आहेत. सुप्रीम कोर्टात आमची बाजू मांडण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार असल्याचे सांगत बोम्मई यांनी थेट महाराष्ट्रातील भाजप सरकारला आव्हान दिले.
हे ही वाचा : ठाण्यात माझ्याविरोधात पोलिसांना आदेश कोण देते हे…, जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटने खळबळ
सीमावाद म्हणजे महाराष्ट्रातील राजकारण्यांचा खेळ
बोम्मई म्हणाले की, सीमावाद हे महाराष्ट्रात राजकीय हत्यार बनले आहे आणि सत्तेत असलेला कोणताही पक्ष राजकीय हेतूने हा मुद्दा उपस्थित करत राहतो. परंतु त्यांना अद्याप यश मिळालेले नाही आणि भविष्यातही मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही कर्नाटकच्या सीमांचे रक्षण करण्यास सक्षम आहोत त्या पद्धतीने पावलेही उचलली आहेत. कर्नाटकची जमीन, भाषा आणि पाण्याचा प्रश्न आल्यावर आम्ही एकत्र काम केले आहे आणि एकत्रितपणे लढलो आहोत. राज्यांच्या पुनर्रचना कायद्यात बदल करण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे बोम्मई म्हणाले.