• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • महाराष्ट्र काबीज करण्यासाठी भाजपची योजना ठरली, आता 2 मुद्द्यांवरच देणार लक्ष!

महाराष्ट्र काबीज करण्यासाठी भाजपची योजना ठरली, आता 2 मुद्द्यांवरच देणार लक्ष!

भाजपकडून मुंबई जवळच्या उत्तन येथील इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये ‘योजना बैठका’ घेण्यात आली आहे.

  • Share this:
मुंबई, 9 फेब्रुवारी : राज्यात भाजपा शिवसेना युती तुटली आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून सातत्याने हे सरकार फार काळ टिकणार नाही आणि भाजप पुन्हा सत्तेत येईल, असा दावा केला जातो. मात्र आता हे सगळं विसरुन पक्षाला राज्यात मजबूत करण्यासाठी भाजपनं पुन्हा एकदा शत प्रतिशत भाजपची योजना तयार केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबई जवळच्या उत्तन येथील इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये ‘योजना बैठका’ घेण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय संघटन मंत्र्यांसह तब्बल 40 नेते या बैठकीत सामील झाले होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुधाकर भालेराव, आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. कोणत्या 2 मुद्द्यांवर भाजप लक्ष केंद्रित करणार? भाजपच्या या बैठकीत राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी दोन कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. यात ओबीसी समाजापर्यंत पोहोचणं आणि राज्यतील युवा शक्तीला आपल्याकडे खेचून घेणं असा भाजपचा दोन कलमी कार्यक्रम आहे. यात ओबीसींच्या हक्कासाठी राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये ओबीसी हक्क परिषद घेणार असल्याची माहिती पक्षाचे नेते आशिष शेलार यांना दिली. हेही वाचा - 'विनायक राऊत जिथे दिसतील तिथे फटकारून काढेन', निलेश राणेंची धमकीची भाषा राज्यातील सत्ताधारी ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर नाहीत अशी टीका सातत्याने भाजपकडून करण्यात येते. त्यामुळे भाजपनं प्रत्येक जिल्ह्यात ‘ओबीसी आरक्षण हक्क परिषद’ घेण्याचं ठरवलं आहे. गेल्या काही काळापासून ओबीसी समाज भाजपपासून दुरावला गेला असल्याची चर्चा आहे. त्यातच ओबीसी नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि पंकजा मुंडे पक्षातील राज्यातील नेत्यांवर नाराज असल्याचा चर्चा कायम होत असतात. त्यामुळे आपला हक्काचा मतदार नाराज होऊ नये याकरता भाजपने ही आरक्षण हक्क परिषद घेण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस सरकारने जे काही निर्णय घेतले त्या शिवाय या सरकारने काहीही केलेले नाही, असं सांगायलाही शेलार विसरले नाहीत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल युवा वर्गात मोठं आकर्षण आहे. अधिकाधिक युवकांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी भाजप आता ‘युवा वॉरियर’ नावाचं अभियान सुरू करणार आहे. यात राज्यातील कानाकोपऱ्यातल्या युवा वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. या युवा वर्गाची ऊर्जा पक्ष वाढीसाठी वापरण्याचा भाजप प्रयत्न करणार आहे. राज्यात काही राजकीय भूकंप होऊन पुन्हा एकदा भाजपचं सरकार सत्तेत येईल अशी आशा भाजपच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र या मानसिक परिस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांना न राहू देता त्यांनी सतत काम करुन तीन विरुद्ध एक असा सामना जिंकून घवघवीत यश मिळवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे.
Published by:Akshay Shitole
First published: